कोरोनामुळे दहावीचे विद्यार्थी सरसकट उत्तीर्ण करण्यात आले आहेत. यथावकाश पुढील शैक्षणिक प्रवेश सुरू होतील. मात्र दहावी नंतर पुढे काय ? ह्या प्रश्नामुळे पालकांची संभ्रमावस्था वाढते. ह्या महत्वपूर्ण विषयावर पालकांना उपयुक्त मार्गदर्शन करताहेत महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांचे नामवंत मार्गदर्शक प्रा. देविदास गिरी..!
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
■ दहावी नंतर पुढे काय ?
हा प्रश्न विद्यार्थी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पालकांना मोठ्या प्रमाणात सतावतो. दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी खूप पर्याय आहेत हे सर्वप्रथम लक्षात घ्या. डॉक्टर, इंजिनिअर, सीए या पर्यायांपेक्षा आज पालक वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करताना दिसतात. एखादा पर्याय निश्चित केल्यानंतर त्या दिशेने विचार केल्यास आपल्याला त्या त्या क्षेत्रात अति उच्च स्थानापर्यंत जाता येते.
■ विद्यार्थ्यांची आवड महत्वाची
पालकांनी एक गोष्ट सतत लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे आपल्या पाल्याला कोणत्या क्षेत्राची, शाखेची, विषयाची आवड आहे. एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या विषयाची आवड नाही आणि पालक त्याच्या सतत मागे लागतात की तू सीए झाला पाहिजे. यातून अनेक संघर्ष होतात. विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय होते. यासाठी विद्यार्थ्याची आवड कशात आहे हे ओळखा. त्यानंतर त्याच्या आवडीच्या क्षेत्राचा विचार करा.
■ चांगले करिअर घडविता येते
कोणत्याही क्षेत्रात उत्तम, चांगले करिअर घडविता येते ही गोष्ट विद्यार्थी आणि पालकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. कला, वाणिज्य, विज्ञान, फार्मसी, वैद्यकिय, कायदा, पत्रकारिता, कृषि, नर्सिंग, शिक्षण, मॉडेलिंग, गायन, नृत्य, अभिनय, फोटोग्राफी, फॅशन डिझायनिंग, इंजिनिअरिंग, सीए, स्पर्धा परीक्षा, आर्किटेक्चर, संगणक, हॉटेल मॅनेजमेंट, पर्यटन, ब्युटीपार्लर, आयटीआय ही नेहमीची आणि माहिती असलेली क्षेत्र सोडून इतरही अनेक क्षेत्रे आहेत. यापैकी कोणतेही एक क्षेत्र निवडत्यानंतर, त्यातील कौशल्ये संपादन केल्यानंतर, त्यातील सर्व ज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर त्यातील संधी शोधून दहावी नंतर, बारावी नंतर, पदवी नंतर आपण विद्यार्थ्यांचे करिअर घडवू शकतो. म्हणून विद्यार्थ्याची आवड, वातावरण, योग्य मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा, विद्यार्थ्यांचे कष्ट या गोष्टी देखील तितक्याच महत्वाच्या आहेत.
■ दहावी हा टर्निंग पॉइंट
दहावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा टर्निग पॉईंट आहे हे निश्चित केल्यानंतर त्याच्या क्षमतेप्रमाणे, आवडीप्रमाणे पुढची दिशा, मार्ग, भवितव्य घडविण्यासाठी वेगवेगळ्या शाखांची, विषयांची, कोर्सेसची, अभ्यासक्रमांची निवड करणे गरजेचे होय. आज विद्यार्थ्यांना यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे हे पालकांनी ओळखले पाहिजे. विद्यार्थ्याच्या करिअरला आपण उज्ज्वल करू शकतो. त्यादृष्टीने या टर्निग पॉईंटचा विचार करणे महत्वाचे होय.
■ पाल्य ही आपली संपत्ती
बंगला, घर, गाडी, दागिने, जागा, ऐश्वर्य हीच आपली संपत्ती आहे हा विचार आता पालकांनी सोडून दिला पाहिजे. माझा पाल्य, माझा मुलगा, माझी मुलगी ही माझी संपत्ती आहे. हा विचार आजच्या जागतिकीकरणाच्या, वैश्विकीकरणाच्या, स्पर्धेच्या काळात करणे गरजेचे होय. म्हणून आपल्या पाल्यांवर लक्ष द्या. त्यांच्या करिअर चा विचार करा. त्यांना योग्य मार्गदर्शन करा. म्हणजे तो तुमचे, तुमच्या कुटुंबाचे भवितव्य उज्ज्वल करू शकेल. यासाठी त्याच्यावर चांगले विचार, संस्कार रूजवा. हा नव्या काळातला नवा विचार आहे. ( क्रमशः )
( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक म्हणून काम पाहतात. )
इगतपुरीनामा वेब पोर्टलचे मार्गदर्शन
‘इगतपुरीनामा’ हे वेब पोर्टल फक्त बातम्या तुमच्यापर्यंत पोहचवणे एवढेच काम करत नाही तर आपल्या विद्यार्थ्यांना, पाल्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्या उत्तम, चांगल्या करिअर साठी मदत करणारे, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा त्यांच्या अंगाने विचार करणारे वेब पोर्टल आहे. ‘उत्तम करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन’ ही सामाजिक बांधिलकीची भूमिका घेऊन विद्यार्थी केंद्रीत उपक्रम, मार्गदर्शनपर लेखन पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार आहे. आता दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर वर्गांचे निकाल टप्प्या – टप्प्याने लागतील. त्यादृष्टीने दहावी नंतर काय? बारावी नंतर काय ? पदवीनंतर काय ? स्पर्धा परीक्षांमध्ये कोणकोणत्या संधी आहेत, त्यासाठी नक्की काय तयारी करायची ? इतर क्षेत्रातील नोकरीसाठी काय संधी उपलब्ध आहेत ? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर पोर्टलला नियमित भेट देत राहा !
24 Comments