
इगतपुरीनामा न्यूज – जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कुऱ्हेगाव जिल्हा परिषद शाळेत ऊर्जा संच बसविण्यात आला आहे. शाळेबाहेर हायमास्ट लॅम्प देखील लावण्यात आला आहे, त्यामुळे सौर ऊर्जेच्या माध्यमातून कुऱ्हेगाव येथील जिल्हा परिषद शाळा प्रकाशमान झाली आहे. मेन्टेनन्स फ्री बॅटरी युनिट सोबत दोन वर्ग खोल्यांमध्ये दोन ट्यूबलाईट व दोन पंखे व पूर्ण फिटिंग अशी व्यवस्था करून देण्यात आली आहे. तीन किलो वॅटच्या या सोलर सिस्टिम युनिट साठी ७ लाख ४७ हजार खर्च आला. इगतपुरी तालुक्यातील १३ शाळांना सोलर संच बसविण्यात येणार असून कुऱ्हेगाव येथील संच कार्यान्वित करण्यात आला आहे. शाळेला अखंड वीस पुरवठा सुरू झाल्याने शाळेतील संगणक व ई लर्निंग व्यवस्था, जलशुद्धीकरण यंत्र यांचा पुरेपूर वापर विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होईल. वीजबिलाच्या कटकटीतून शाळेची कायमची मुक्तता झाली आहे. मैदानातील हायमास्टमुळे परिसरातील अंधार दूर झाला असून त्यामुळे शाळा परिसरातील गैरप्रकार बंद होऊन शाळा सुरक्षित झाली. सौरसंच उपलब्ध करून दिल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.