जिजाऊ ब्रिगेडतर्फे “शिवधर्म” विषयावर परिसंवाद : शनिवारी जिजाऊ ब्रिगेडच्या फेसबुक पेजवर ऑनलाईन कार्यक्रम

इगतपुरीनामा न्यूज, दि. ५

अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी, परंपरा नष्ट व्हाव्यात या उद्देशाने मराठा सेवा संघाने शिवधर्म या नवीन संकल्पनेची सुरुवात केली. याचा प्रचार आणि प्रसार व्हावा, शिवधर्माचे मानवी जीवनातील महत्त्व समजावे, शिवधर्माविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेडने शनिवारी ७ ऑगस्टला ऑनलाइन फेसबुक परिसंवादाचे आयोजन केले आहे अशी माहिती जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा माधुरी भदाणे यांनी दिली.

फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात काय असेल ?

शिवधर्म म्हणजे काय ?
शिवधर्म निर्मिती मागचा इतिहास काय ?
शिवधर्म आणि इतर धर्मातील फरक काय ?
शिव संकल्पनेचे स्वरूप ?
शिवधर्मात स्त्रीविषयक भूमिका काय ?
शिवधर्मात सणांचे महत्त्व
शिव म्हणजे नेमके काय ?
शिवधर्म काळाची गरज

यावेळी विविध विषयांवरील परिसंवादात शिवधर्माविषयी सखोल मार्गदर्शन होणार आहे. फेसबुक लाईव्ह कार्यक्रमावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे करणार आहेत. या परिसंवादात  वधू-वर कक्षाचे प्रदेशाध्यक्ष बी. टी. देवरे, मराठा सेवा संघाचे धुळे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भदाणे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रथम अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. उषा पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्ष सुलभा कुवर, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष प्रा. उषा साळुंखे, प्रदेश सदस्या प्रा. वसुंधरा लांडगे सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन जिजाऊ ब्रिगेडच्या धुळे जिल्हाध्यक्ष नुतन पाटील करणार आहेत. या कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेड, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड आणि इतर कक्ष परिश्रम घेत आहेत.

असा आहे शिवधर्म
मानवी जीवनावर धर्माचा विलक्षण प्रभाव आहे. या प्रभावामुळे आपल्याला धर्म हवा असेल तर तो विधायक असावा. विघातक धर्मात अज्ञान, शोषण, विषमता यासारखे मानवद्रोही घटक असतात. याउलट विधायक धर्मात एक अत्यंत निकोप, प्रसन्न, निर्मळ अशी व्यवस्था असते. याचाच विचार करून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी जिजाऊ जन्मदिनाचे औचित्य साधत १२ जानेवारी २००५ ला जिजाऊ सृष्टी सिंदखेडराजा येथे शिवधर्म प्रकटन नावाने ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला होता. शिवधर्म निर्मिती सामूहिक विवेचन असले तरी शिवधर्माच्या निर्मितीचे श्रेय ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांना जाते. त्यांनी ५००० पेक्षा जास्त वर्षांतील धर्माचा अभ्यास आणि समाज वास्तव्य व विविध धर्माचा चिकित्सक अभ्यास केला. अभ्यासपूर्ण मांडणी करत शिवधर्माची आचरण पद्धत निश्चित करून शिवधर्म गाथा लोकांसमोर ठेवली.

देशभरातुन मोठ्या संख्येने या नवविचार असलेल्या शिवधर्माचे स्वागत होत आहे. कोरोना काळात निर्बंध असल्याने जगभरात ऑनलाईन कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठा सेवा संघाची पुरोगामी विचारधारा जनमानसात नेण्याचा जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांचा प्रयत्न आहे. शिवधर्म हा विषय सर्वांनी समजून घ्यावा.
- माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्षा जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!