
इगतपुरीनामा न्यूज, दि. ७
प्रहार संघटनेच्या सहकार्याने एका अत्यवस्थ कोरोना बाधित रुग्णाला वेळेत ऑक्सिजन आणि आरोग्य सेवा मिळाल्याने त्याचे प्राण वाचले. विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांत फिरूनही आरोग्य सेवा न मिळाल्याने हा रुग्ण शेवटच्या घटका मोजत होता. मात्र योग्य वेळी प्रहार संघटनेने मदत केल्याने त्याचा प्राण वाचला. कोरोनामुक्त झाल्याने आज ह्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. संबंधिताचे वडील माजी सैनिक असून त्यांच्यासह कुटुंबीयांनी प्रहार संघटनेचे ऋण व्यक्त केले आहेत.
अस्वली हर्ष ता. त्र्यंबकेश्वर येथील चेतन श्रावण गांगड हा ३५ वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले. त्याला मोठ्या प्रमाणावर त्रास सुरू झाला. श्वास घ्यायला मोठ्या प्रमाणावर त्रास झाल्याने संबंधित कुटुंबीय व्यथित झाले. त्र्यंबकेश्वर, घोटी आणि अन्य खाजगी रुग्णालयात चेतन गांगड याला घेऊन गेले. मात्र कुठेही बेड उपलब्ध नसल्याने जीव जाण्याची वेळ आली. एकीकडे रुग्णाच्या जीवाला धोका निर्माण झाला होऊन श्वास घेता येत नव्हता. याबाबत प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष सपन परदेशी, नितीन गव्हाणे यांनी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके यांची मदत घेतली. योग्य वेळेत ऑक्सिजन आणि अत्यावश्यक आरोग्य सेवा मिळाल्याने आज चेतन गांगड याचे प्राण वाचले. एचआरसीटी स्कोअर १८ ते २५ असतांनाही रुग्णाने डॉक्टरांसह सर्वांच्या मदतीने कोरोनावर मात केली. आज चेतनला कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.
चेतन हा सेवानिवृत्त सैनिक श्रावण हेमा गांगड यांचा मुलगा असून माजी सैनिकाच्या मुलाला जीवदान मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. आई वत्सला श्रावण गांगड, पत्नी आशा चेतन गांगड यांनी वैद्यकीय अधिक्षिका डॉ. स्वरूपा देवरे आणि सर्व सहकाऱ्यांचे आनंदाश्रुनी आभार मानले. प्रहार संघटनेचे उपाध्यक्ष सपन परदेशी, नितीन परदेशी यांचेही ऋण व्यक्त केले.