
इगतपुरीनामा न्यूज : १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांसाठी राज्य सरकारने हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवणे कायद्याने बंधनकारक केले आहे. यासाठी 30 एप्रिल ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या तालुक्यातील २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनधारकांचीही नव्या पद्धतीची नंबर प्लेट बसवण्यासाठी लगबग सुरू आहे. मात्र ऑनलाईन नोंदणी करूनही वाहनधारकांना संबंधित वितरण केंद्रावरून नंबर प्लेट वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नाहक मनस्तापाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यातील एचएसआरपी फिटमेंट सेंटरची संख्या वाढवावी, आणि नंबर प्लेट बसवण्याचे व्यवस्थित नियोजन करण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत इगतपुरी तालुक्यात दुचाकी वाहनांसाठी घोटी येथे फिटमेंट सेंटरची सुविधा उपलब्ध असून चार चाकी वाहनांसाठी मात्र नाशिक शहर शिवाय पर्याय नाही. या नव्या पद्धतीच्या नंबर प्लेटची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने करावी लागते. नोंदणी करून निर्धारित रक्कम अदा केल्यानंतर आरटीओ कडून नंबर प्लेट तयार करून संबंधित फिटमेंट सेंटरकडे पाठवली जाते. मात्र तीस एप्रिल ही अंतिम मुदत असल्याने सर्वत्रच वाहनधारकांची रजिस्ट्रेशन साठी लगबग सुरू असून त्याचा परिणाम नियोजनावर झाला आहे. वाहनधारकांना जरी ऑनलाइन संबंधित फिटमेंट सेंटरची तारीख मिळत असली तरी त्या तारखेला संबंधित सेंटरपर्यंत नंबर प्लेटच पोहोचत नसल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे फिटमेंट सेंटर मालक आणि वाहनधारक यांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर एक तारीख दिली जाते मात्र त्या तारखेपर्यंत नंबर प्लेट संबंधित फीटमेंट सेंटरवर पोहोचत नसल्याने ग्राहक आणि संबंधित सेंटरधारक यांच्यात वाद होताना दिसत आहे. केवळ इगतपुरी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्याच्या बहुतांश भागात हीच परिस्थिती असून नोंदणी केल्याच्या तारखेनंतर तब्बल दहा ते पंधरा दिवस उशिरा नंबर प्लेट पोहोचत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी संबंधित विभागाने त्वरित याचे व्यवस्थित नियोजन करून ग्राहकांना होणारा मनस्ताप टाळावा अशी मागणी दुचाकी वाहनधारकांकडून केली जात आहे.