दहावी बारावी नंतर विद्यार्थ्यांच्या भवितव्याची चिंता प्रत्येक पालकाला असते. त्यासाठी प्रत्येकाला योग्य वेळी योग्य मार्गदर्शक लाभावा लागतो. आता पालकांनी चिंता करण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील यशवंत विद्यार्थ्यांची मोठी फौज घडवणारे स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक प्रा. देविदास गिरी आपल्याला नियमित मार्गदर्शन करणार आहेत. यासाठी इगतपुरीनामा वेब पोर्टलला नियमित भेट देत राहा..! – भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा वेब पोर्टल.
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
■ कला ( Arts ) शाखेतील करिअर
कला शाखेला प्रवेश – दहावीनंतर जवळपास 35 ते 40 टक्के विद्यार्थी अकरावी कला ( Arts ) वर्गाला प्रवेश घेतात. आजही कला शाखेकडे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा अधिक आहे. विशेषतः ग्रामीण आदिवासी क्षेत्रातील विद्यार्थी या शाखेला पसंती देताना दिसतात. या शाखेतून करिअर घडविण्यासाठी असंख्य संधी आज उपलब्ध आहेत.
■ अकरावी बारावी कला
दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी कला व बारावी कला अशा २ वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर या शाखेत, या क्षेत्रात भरपूर संधी आहेत. त्यामुळे या शाखेला विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवेश घेतात ही वस्तुस्थिती होय.
■ बारावी कला नंतरच्या संधी
बारावी कला शाखेचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बी. ए. ची पदवी इंग्रजी, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मराठी, हिंदी, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, संरक्षणशास्त्र, ग्रामीण विकास आदी विषयांमध्ये पदवीधर होऊन पुढील शिक्षण घेता येते. या सर्व विषयांमध्ये पुढे विद्यार्थ्याला चांगले करिअर सुद्धा करता येते.
■ स्पर्धा परीक्षांची तयारी
आज महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा कल स्पर्धा परीक्षांकडे वाढत चालला आहे. वरील विषयांमध्ये पदवीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थी मोठ्या प्रमाणात स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( MPSC) वतीने राज्य सेवा परीक्षेच्या माध्यमातून
१. उपजिल्हाधिकारी गट अ
२. पोलीस उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त गट अ
३. तहसीलदार गट – अ, ४. विक्रीकर अधिकारी गट अ
५. उपनिबंधक सहकारी संस्था गट अ
६. उपमुख्य कार्यकारी अधिकारी / गटविकास अधिकारी ( उच्च श्रेणी ) गट अ
७. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ ( कनिष्ठ )
८. मुख्याधिकारी, नगर पालिका / परिषद गट अ
९ . महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट ब
१०. कक्ष अधिकारी गट ब
११. गटविकास अधिकारी गट ब
१२. मुख्याधिकारी नगरपालिका / नगर परिषद गट ब १३. सहायक निबंधक सहकारी संस्था गट ब
१४. तालुका निरीक्षक / उप अधीक्षक भूमि अभिलेख गट ब
१५. उप अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गट ब
१६. नायब तहसिलदार गट ब
आदी राज्य सेवा परीक्षांची तयारी बी. ए. ची पदवी मिळवित असताना चांगल्या प्रकारे अभ्यास करून, नियोजन करून केल्यास पदवीधर होतानाच चांगल्या पदाची शासनाची सरकारी नोकरी विद्यार्थी मिळवू शकतो. येथे संपूर्ण यादी देण्याचा हेतू हा आहे की अनेक पालकांना, विद्यार्थ्यांना माहीत नाही की इतक्या पदांसाठी राज्य सेवा परीक्षा होते.
■ विक्रीकर निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक
या पदांसाठी देखील विद्यार्थी पदवीची तयारी करत असताना या पदाच्या परीक्षांची तयारी करु शकतो. येथे पालकांची भूमिका महत्वाची आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना त्या त्या टप्प्यांवर मार्गदर्शन केले पाहिजे.
■ इतर स्पर्धा परीक्षांची तयारी
वरील प्रमाणेच विद्यार्थी पदवी परीक्षा देत असताना UPSC, BANK, SSC ( स्टाफ सिलेक्शन कमिशन ), रेल्वे इत्यादींच्या परीक्षांची देखील तयारी करु शकतो. याचे महत्वाचे कारण म्हणजे ज्याप्रमाणे विज्ञान शाखेचा विद्यार्थी प्रॅक्टीकलमुळे व्यस्त असतो. तसे कला शाखेच्या विद्यार्थ्याला प्रॅक्टीकल नसल्यामुळे वेळ बराच असतो. त्यावेळेचा उपयोग स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी करता येतो हे विद्यार्थ्यांनी व पालकांनी लक्षात घ्यावे.
■ बारावी नंतरच्या इतर संधी
वर उल्लेख केलेल्या परीक्षांच्या व्यतिरिक्त विद्यार्थी खालील प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर पात्र असतो.
१. आयटीआय
२. आर्ट टिचर डिप्लोमा ( ATD )
३. फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रम
४. नर्सिंग कोर्स
५. बी. व्ही. ए. ( बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्ट )
६. म्युझिकमध्ये पदवी
७. हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रम
८. पर्यटन विषयातील कोर्स / पदवी
९. एल. एल. बी. प्रवेशासाठी पात्र
१०. प्रिटिंग टेक्नॉलॉजीमधील डिप्लोमा
११. शिक्षण शास्त्रातील पदवी
१२. एमपीएससीच्या लिपिक आणि टंकलेखक परीक्षेसाठी पात्र.( टंकलेखक कौशल्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण )
१३. पोस्ट खात्यातील पोस्टमास्तर, डाकसेवक पदासाठी
१४. डी. टी. एड. प्रवेशासाठी पात्र
आदी अनेक क्षेत्रांमध्ये विद्यार्थी इयत्ता बारावीनंतर चांगल्या प्रकारचे करिअर करून पुढील शिक्षण देखील घेऊ शकतो. ( क्रमशः )
या लेखमालेतला पहिला लेख वाचण्यासाठी लिंक वर क्लिक करा👇
करिअर मार्गदर्शन : १० वी नंतर पुढे काय ? लेखांक १
( लेखक इगतपुरी येथील केपीजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )
इगतपुरीनामा वेब पोर्टल विद्यार्थ्यांसाठी
‘इगतपुरीनामा’ हे वेब पोर्टल फक्त बातम्या तुमच्यापर्यंत पोहचवणे एवढेच काम करत नाही तर आपल्या विद्यार्थ्यांना, पाल्यांना योग्य मार्गदर्शन करुन त्यांच्या उत्तम, चांगल्या करिअर साठी मदत करणारे, विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा त्यांच्या अंगाने विचार करणारे वेब पोर्टल आहे. ‘उत्तम करिअर निवडीसाठी योग्य मार्गदर्शन’ ही सामाजिक बांधिलकीची भूमिका घेऊन विद्यार्थी केंद्रीत उपक्रम, मार्गदर्शनपर लेखन पोर्टलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोचणार आहे. आता दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर वर्गांचे निकाल टप्प्या – टप्प्याने लागतील. त्यादृष्टीने दहावी नंतर काय? बारावी नंतर काय ? पदवीनंतर काय ? स्पर्धा परीक्षांमध्ये कोणकोणत्या संधी आहेत, त्यासाठी नक्की काय तयारी करायची ? इतर क्षेत्रातील नोकरीसाठी काय संधी उपलब्ध आहेत ? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं हवी असतील तर पोर्टलला नियमित भेट देत राहा !
7 Comments