तिसऱ्या लाटेत बालकांना धोक्याची शक्यता अधिक असल्याने नियोजन करावे ; रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधींचे योगदान महत्त्वाचे – पालकमंत्री छगन भुजबळ

इगतपुरीनामा न्यूज, दि. ८ ( जिमाका वृत्तसेवा )
कोरोनाची दुसऱ्या लाटेमध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ऑक्सिजन व रेमडेसिविर यांचा पुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्या अनुषंगाने लहान मुलांच्या उपाचारासाठी स्वंतत्र कक्ष तयार करण्यात येवून त्याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. तसेच वाढत्या रुग्ण संख्येच्या नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये कोरोना निर्बंध पाळण्यासाठी समुपदेशन व प्रबोधन करून योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत नाशिक जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थिती, लसीकरण व उपाययोजना आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, खासदार हेमंत गोडसे, डॉ. भारती पवार, नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी, मालेगाव महानगरपालिकेच्या महापौर ताहेरा शेख रशिद, आमदार सर्वश्री नरेंद्र दराडे, ॲड  माणिकराव कोकाटे, दिलीप बोरसे, दिलीप बनकर, मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक, डॉ. राहुल आहेर, सीमा हिरे, नितीन पवार, हिरामण खोसकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, निवासी उपजिलहाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ, वासंती माळी, अन्न औषध प्रशासनच्या सहायक आयुक्त माधुरी पवार, महानगरपालिका बिटको रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, नोडल अधिकारी डॉ. आवेश पल्लोड, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी केंद्र सरकार व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यात आवश्यक सर्व प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधांचे बळकटीकरण करून त्या कायमस्वरूपी उपलब्ध करण्यावर भर देवून मनुष्यबळ वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी प्रशासकीय अधिकारी यांना दिल्या आहेत.
जिल्ह्यातील ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी जिल्ह्यात 29 ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्र सुरू करण्यात येत आहेत. ज्यामुळे भविष्यातील ऑक्सिजनची गरज पूर्ण करणे शक्य होणार आहे. तसेच आदिवासी भागातील नागरिक ज्या डॉक्टर व तेथील स्थानिक औषोधोपचार करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवून आजारपणात इलाज करतात, अशा डॉक्टर्स व स्थानिक लोकांची बैठक घेवून त्यांना कोरोनाच्या लढाईत सहभागी करून घेण्यात यावे, जेणे करून त्यांच्यामार्फत आदिवासी भागातील नागरिकांमध्ये कोरोना आजाराच्या उपचार विषयी जागृती होवून आदिवासी भागातील कोरोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी मदत होईल.
18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी ऑनलाईन नावनोंदणी करतांना काही तांत्रिक अडचणी येत असल्याने राज्य शासनाने लसीकरणाच्या नाव नोंदणीसाठी नवीन प्रणाली विकसित करण्याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला असल्याचे पालकमंत्री श्री.भुजबळ यांनी सांगितले. तसेच   राज्यशासनाने गेल्या तीन चार दिवसांपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्या स्थिर होती, परंतू ती पुन्हा नव्याने वाढू नये यासाठी लागू करण्यात आलेले कडक निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिस यंत्रणेने कारवाई करावी. पोलिसांच्या सहकार्याशिवाय लागू करण्यात आलेले निर्बंध यशस्वी होणार नसल्याने पोलिसांची भुमिका या काळात अत्यंत महत्वाची आहे.

आरोग्य सुविधांच्या बळकटीवरणावर भर देण्यात यावा :  कृषिमंत्री दादाजी भुसे

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सर्व शासकीय रुग्णालयांचे बळकटीकरण करण्यात यावे, जेणेकरुन येणाऱ्या तिसऱ्या लाटेला सामोरे जातांना अडचणी निर्माण होणार नाही. शहराला लागून असलेल्या तालुक्यात रुग्णसंख्या वाढीचे प्रमाण अधिक आहे. तसेच ग्रामीण भागात होणाऱ्या अंत्यविधीसाठी नातेवाईकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, नियमबाह्य लग्न सोहळे यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी पोलीस विभागाला बैठकीत दिल्या आहेत.

लसीकरणासाठी आदिवासी भागात जनजागृती करण्यात यावी: नरहरी झिरवाळ

नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यामंध्ये आदिवासी समाज कोरोनावरील उपचार व लसीकरणासाठी पुढे येत नूसन त्यांच्या मनात अनेक गैरसमज निर्माण झाले आहे. त्यामुळे आदिवासी बांधवाना कोरोना आजाराचे गांभीर्य व लसीकरणाचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी बैठकीत सांगितले.

सिटीस्कॅन सेंटरवरील गर्दी टाळण्यासाठी पोलीस विभागाने कार्यवाही करावी : बाळासाहेब क्षीरसागर

कारोनाबाधित रुग्णांची एच.आर.सी.टी करण्यासाठी सिटी स्कॅन सेंटरवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते या गर्दीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवावे. तसेच बाजारपेठांवर होणाऱ्या गर्दीबाबतही कठोर कारवाई करण्यात यावी, असे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले.

या बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्हा प्रशासनाने ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर पुरवठ्याबाबत व इतर आरोग्य सोयीसुविधांच्या बळकटीकरणासाठी केलेल्या नियोजनाची माहिती सर्व मंत्री महोदय व लोकप्रतिनिधींसमोर सादर केली. यावेळी उपस्थित आमदार व लोकप्रतिनिधींनी त्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणींच्या दृष्टीने ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिव्हिर, कोविड केअर सेंटर्स, लसीकरण आदी विषयांवर चर्चा केली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!