इगतपुरीनामा न्यूज – त्र्यंबकेश्वर येथील आवाहन आखाड्याचे ठाणापती, अंजनीमाता, बालहनुमान मंदिर आश्रमाचे महंत ब्रम्हगिरी महाराज अशोकबाबा गुरुवारी ५ डिसेंबरला ब्रम्हमुहूर्तावर पहाटे ब्रम्हलीन झाले. संपूर्ण त्र्यंबकेश्वर शहरातून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. अंजनेरी येथील अंजनी माता मंदिराशेजारी समाधी सोहळा व पूजन झाले. यावेळी त्र्यंबकेश्वर व परिसरातील अनेक भाविकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. सोळाव्या दिवशी साधू महंत परंपरेनुसार सर्व आखाड्यांचे प्रतिनिधी व साधु-महंत यांचे उपस्थितीत षोढशीचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भजन,कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. समाधी पूजनानंतर साधु-महंत पूजन आदी कार्यक्रम पार पडले. याप्रसंगी आलेल्या हजारो भाविकांनी समाधी दर्शनानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. वयाच्या दहाव्या वर्षांपासून ब्रम्हगिरी महाराज यांनी चौदा वर्षे अंजनेरी पर्वतावर तपश्चर्या केली होती. अनेक वर्षे ते तेथे वास्तव्यास होते. प्रथमपासूनच अंजनी माता मंदिर परिसर विकास व बालहनुमान मंदिराचे निर्माण हा त्यांचा ध्यास होता. यासाठी त्यांनी केंद्र सरकारचेही लक्ष वेधले होते. अंजनी पर्वतावर त्यांनी दत्त मंदिर, देवी देवतांचे मंदिर निर्माणाचे महत्वाचे कार्य केले. आजही अंजनेरी पर्वतावर दत्त जयंती, हनुमान जयंती उत्सव मोठ्या भक्तीभावाने व उत्साहाने पार पडतात. त्र्यंबकेश्वर येथील श्री शंभु पंचदशनाम आवाहन आखाड्याचे भारतीय आखाडा परिषदेमार्फत आजीवन ठाणापाती म्हणून ते कार्यरत होते. त्यांनी ऋषिमुख पर्वत अंजनेरीचे पायथ्याशी अंजनीमाता व बालहनुमानाचे भव्य असे मंदिर उभारले. येथेही दरवर्षीप्रमाणे दत्त जयंती व हनुमान जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने व भक्तीभावाने साजरे होतात. यावेळी हजारो भाविक उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतात.
Similar Posts
error: Content is protected !!
WhatsApp us
Join WhatsApp Group