‘तिची’ एसटीमध्येच झाली प्रसूती ; महिला वाहकाच्या मदतीमुळे बाळ आणि महिला सुखरूप

किरण घायदार : इगतपुरीनामा न्यूज : धावत्या रेल्वेत वा बसमध्ये प्रसुती कळा सुरू होऊन महिला प्रसूत झाल्याच्या अनेक घटना आपण वाचतो, ऐकतो. तशाच प्रकारची एक घटना आज बुधवारी दुपारी नाशिक ते नंदुरबार या एसटी बसमध्ये घडली. नाशिक नंदुरबार बस क्रमांक एमएच 40 वाय 5668 ह्या बसमध्ये सटाणा दरम्यान प्रवास करणाऱ्या गरोदर महिलेची प्रसूती झाल्‍याची माहिती एसटी चालक वाहकाने दिली. प्रसुती झालेली महिला आणि बाळ हे सुखरूप असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले आहे. नाशिक येथून नंदुरबार बसने मोलमजुरी करणारे दाम्पत्य प्रवास करीत होते. बसच्या आदळआपटीमध्ये अचानक महिलेच्या पोटात दुखू लागले. तिला बसमध्येच प्रसूती कळा सुरु झाली. पंचवटी आगारातील  वाहक सौ. पीनाताई राठोड यांना घटनेचे गांभीर्य समजताच त्यांनी तात्काळ सर्व प्रवाशांना बस खाली उतरवले. गर्भवती महिलेला धीर देऊन त्यांनी मदतीचा हात पुढे करून त्या महिलेची सूखरुप प्रसूती केली. संबंधित महिलेला पुत्ररत्न प्राप्त झाले. यानंतर चालक व वाहक यांनी त्या महिलेस हॉस्पिटलमध्ये दाखल करून पुढील कामगिरी करण्यासाठी नंदुरबारकडे मार्गस्थ झाले. वाहक सौ. पिना राठोड या 2009 मध्ये रा. प. सेवेत रुजू झाल्या आहेत. त्या म्हाडा, सातपूर येथे राहत असून नर्सिंगचा कोर्स केला असल्याचे त्यांनी सांगितले. चालक व वाहकांच्या प्रसंगावधाने आई व बाळ सुखरूप आहे. राठोड यांनी प्रसंगावधान दाखवत वेळेवर महिलेची प्रसूती करून रुग्णालयात दाखल केले. याबद्दल प्रवाशांनी वाहक सौ. राठोड यांचे कौतुक केले.

error: Content is protected !!