इगतपुरीनामा न्यूज, दि. १३
वर्तमानकाळात रोजगार उपलब्धतेबाबत मोठी आव्हाने निर्माण झाली आहेत. ग्रामीण शेतकऱ्यांच्या बाजारपेठेतील बदलांचे परिणाम वेगाने दिसून येतात. ग्रामीण भागातही निसर्गघटकांवर ही अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने कृषिपूरक उद्योगांवर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी भर द्यायला हवा. त्यासाठी मधुमक्षिका पालन हा उत्तम पर्याय ठरू शकतो असे प्रतिपादन इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी केले. इगतपुरी तालुक्यातील आडवण येथे खादी ग्रामोद्योग महामंडळ आणि नॅशनल लिटरसी फॅमिली वेल्फेअर आणि रूरल डेव्हलपमेंट सोसायटी नागपूर शाखा इगतपुरी यांच्या सहकार्याने मधमाशी जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी आमदार हिरामण खोसकर पुढे म्हणाले की, मधुमक्षिकांचे पोळे दिसले, की ते पाडले जाते अथवा ते नष्ट केले जाते. मधुमक्षिकांबद्दल असलेली अपुरी माहिती आणि गैरसमज यातून हे प्रकार वाढले असून, मधुमक्षिकांचे संरक्षण व संवर्धन व्हावे आणि मधुमक्षिका पालन उद्योगासंदर्भात जनजागृती व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील आहे. व्यासपीठावर माजी आमदार शिवराम झोले, माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, बाळासाहेब वालझाडे, अर्चना कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर म्हणाले की, मधुमक्षिका हा मनुष्याला उपयुक्त असा कीटक आहे. मात्र, त्याबद्दल अनेक गैरसमजही आहेत. मधनिर्मिती, मेणनिर्मिती यांसारख्या अनेक गोष्टींसाठी मनुष्याला त्याचा उपयोग होत असतो. मधुमक्षिकांकडून आपल्याला तब्बल १९ प्रकारचे मध मिळते. मधुमक्षिका पालनाशी संबंधित तब्बल ४६ प्रकारचे उद्योगही करणे शक्य आहे. दिवसभराच्या प्रशिक्षणात शास्त्रज्ञ तुकाराम निकम, प्राचार्य अनिल माळी, मधपाल गौतम डेमसे, गजानन भालेराव, सिन्नरचे केंद्रचालक सचिन उगले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, मध संचालक डी. आर. पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रवींद्र बुचडे, मधूक्षेत्रीक के. व्ही. सुरवाडे, राहुल रुपवते यांनी उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले. प्रशिक्षणात विविध शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन प्रगतिशील शेतकरी भगीरथ भगत केले.