देशासाठी रक्त सांडणाऱ्या सैनिकांचा अपमान करणाऱ्या अभिनेत्री कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : जिजाऊ ब्रिगेडची पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे  मागणी

जिजाऊ ब्रिगेडचा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा

इगतपुरीनामा न्यूज, दि. १३

देशासाठी रक्त सांडणाऱ्या सैनिकांचा, हुतात्म्यांचा अपमान करणाऱ्या कंगना राणावत यांनी ‘१९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले.’ असे निंदनीय वक्तव्य करून संपूर्ण देशासह स्वातंत्र सैनिकांचा अपमान केला. त्यांना देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घेऊन देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिजाऊ ब्रिगेडने केली आहे. प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची भेट घेऊन नाशिक जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी निवेदन दिले.
जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष माधुरी भदाणे यांच्यासमवेत जिल्हाध्यक्ष अनुराधा धोंडगे, नाशिक महानगर प्रमुख चारुशिला देशमुख, जिल्हा कार्याध्यक्ष कल्याणी वाघ, सुरेखा कोल्हे, शहर संघटक गायत्री गाडेकर, कल्पना निंबाळते, संगीता पाटील यासह पदाधिकारी उपस्थित होत्या.

सिनेअभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यासाठी आमची मागणी आहे. यासंदर्भात पोलिसांकडून 3 दिवसात चौकशी करून कळविले जाईल असे आम्हाला सांगितले आहे. पोलीस काय निर्णय घेतात याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यानुसार जिजाऊ ब्रिगेड पुढची भूमिका ठरविणार आहे.
- चारुशीला देशमुख, नाशिक महानगरप्रमुख जिजाऊ ब्रिगेड

निवेदनात असे म्हटले आहे की,कला क्षेत्रात केलेल्या कामगिरीमुळे कंगना राणावत यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला. मात्र कला क्षेत्र वगळता अभिनेत्री कंगना या प्रत्येक क्षेत्रात नको त्या ठिकाणी आपले बेताल वक्तव्य करत प्रसिद्धी झोकात राहण्याचा प्रयत्न करत असतात. याच कारणाने त्यांचे ट्विटर खाते बंद केले होते. पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचे पाय जमिनीवर नसून सध्या त्या हवेत आहेत. त्यांनी प्रसार माध्यमांसमोर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या हुतात्म्यांचा अवमान केला आहे. निंदनीय वक्तव्याने देशात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे निंदनीय वक्तव्याचा आपण गांभीर्याने विचार करून त्यांचा पद्मश्री पुरस्कार परत घेऊन त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी  केली.

पद्मश्री पुरस्कार प्राप्त कंगना राणावत यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केले त्यामुळे देशासाठी रक्त सांडणाऱ्या सैनिकांचा, हुतात्म्यांचा मोठा अपमान झालेला आहे. पुरस्कार मागे न घेतल्यास पद्मश्री पुरस्काराचा अपमान होईल. राष्ट्रपतींचाही अपमान होईल. त्यामुळे गुन्हा दाखल करून पुरस्कार मागे न घेतल्यास जिजाऊ ब्रिगेडतर्फे राज्यभर आंदोलन करण्यात येईल.
- माधुरी भदाणे, प्रदेशाध्यक्ष, जिजाऊ ब्रिगेड

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!