निलेश काळे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १५
शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकाची नोंदणी स्वत:च करता येण्यासाठी शासनाने ‘ई-पीक पाहणी’ हे मोबाईल ॲप तयार केले आहे. ह्या ॲपचा वापर करून शेतकरी आपल्या शेतातील पिकाची नोंद सातबारावर करू शकणार आहे. ई-पीक पाहणी बाबत तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी संदीप कडनोर यांनी मार्गदर्शन केले. गावातील होतकरू तरुण व स्वयंसेवक यांना प्रशिक्षण देऊन उर्वरित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन तलाठी कडनोर यांनी केले.
यावेळी तलाठी संदीप कडनोर, सोसायटीचे अध्यक्ष पंढरीनाथ काळे, दत्तू काळे, संपत कदम, उमेश बेंडकोळी, शाम कुलाळ, मुरलीधर गातवे, युवराज गातवे, नामदेव काळे आदी उपस्थित होते. नोंदणी करतांना करायच्या पद्धती शिबिरामध्ये देण्यात आल्या असून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन श्री. कडनोर यांनी केले.
पूर्वी दोन-तीन गावांसाठी एकच तलाठी असल्याने वेळेवर पीक पाहणी करून नोंदवली जात नव्हती. वेळेवर नोंदणी न झाल्याने शेतकऱ्यांचे हेलपाटे होत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना सुलभ व पारदर्शकता येण्यासाठी ॲप विकसित केले आहे. गावपातळीवरील महसूल लेखे ठेवण्यासाठी विविध नमुने व दुय्यम नोंदवह्या असून ७/१२ उतारा शेतकऱ्यांना नेहमीच गरजेचा आहे. गाव नमुना ७ हा अधिकार अभिलेख विषयक असून गाव नमुना १२ हा पिकांची नोंदवही संदर्भात आहे. पीक पाहणी नोंदणी केल्यानंतर गाव नमुना १२ मध्ये अद्ययावत नोंदणी होणार आहे.
ई-पीक पाहणीचे हे आहेत फायदे
● शेतकऱ्यांना स्वतःच्या पिकांची नोंदणी स्वतःच करता येणार.
● शेतकरी स्वतःच नोंदणी करता येणार असल्याने सुलभता व पारदर्शकता येणार.
● पीक पाहणी दावे निकाली काढण्याची प्रक्रिया सुलभ होईल.
● शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास सुलभता येईल.
● नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास अचूक मदत व भरपाई मिळेल.
● पीक पाहणीमुळे अचूक क्षेत्र कळणार असून बिगर बागायती क्षेत्रावर मिळणाऱ्या भरपाईला चाप बसणार आहे.
● शासनाच्या योजना, पीककर्ज, पीकविमा, कर्जमाफी, न्यायालयीन प्रकरणे ह्या ठिकाणी माहितीचा उपयोग होणार आहे.