इगतपुरी तालुक्यातील १० महिला बचत गटांना मिळाला “महिंद्रा”चा आधार : कृषी विभागाच्या “विकेल ते पिकेल” साठी महिंद्राचे लाभणार साहाय्य

इगतपुरीनामा न्यूज, दि. १५

महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या तालुका कृषी अधिकारी इगतपुरी कार्यालयामार्फत “विकेल ते पिकेल अभियान” सुरू आहे. ह्या अंतर्गत शेतकरी ते ग्राहक थेट विक्री व्यवस्थेसाठी इगतपुरी येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बचत गटांना विविध साहित्य वाटप करण्यात आले. प्रातिनिधिक स्वरूपात घोटी येथील कळसुबाई महिला बचत गटाला लोखंडी रॅक, टेबल खुर्ची, छत्री, वजन काटा, मापे इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले. स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर शेतमाल विक्री स्टॉलचे आज उदघाटन करण्यात आले.

आज स्वातंत्र्य दिनी घोटी येथे साहित्य वाटप व उदघाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे जनरल मॅनेजर टॉम थॉमस, डेप्युटी मॅनेजर कैलास ढोकणे, मॅनेजर जयंत इंगळे, इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलतांना जनरल मॅनेजर टॉम थॉमस यांनी कंपनीतर्फे यापुढेही कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बचत गटांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. इगतपुरी येथील कंपनीच्या आवारात बचत गटाने शेतमाल विक्रीचा स्टॉल उभारावा अशी अपेक्षा व्यक्त केली. इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनी विकेल ते पिकेल अभियान अंतर्गत बचत गटांचे महत्त्व विशद करून शेतकरी ते ग्राहक यामधील साखळी कशी कमी करता येईल याबाबत सर्वांगीण माहिती दिली. शेतकरी बचत गटांना साहाय्य केल्याबद्धल कंपनीच्या अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. महिंद्रा कंपनीतर्फे इगतपुरी तालुक्यातील एकूण १० बचत गटांना विविध साहित्याचे किट पुरविण्यात आलेले आहेत.

घोटी येथील कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पाळून संपन्न झालेल्या कार्यक्रमप्रसंगी महिंद्रा कंपनीचे शिवम गोयल, सुरक्षा अधिकारी हरीश चौबे, प्रतीक पांडे, मंडळ कृषी अधिकारी भास्कर गीते, चंद्रशेखर अकोले, अनिल मुजगुडे, कृषी पर्यवेक्षक रामा दिघे, संजीव चव्हाण, किशोर भरते, कृषी सहाय्यक मोहन तागड, प्रियांका पांडुळे, रजनी चौधरी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक हितेंद्र मोरे, महिला बचत गटांच्या अध्यक्ष रंजना रायकर, सचिव स्वाती रंधवे उपस्थित होते.

इगतपुरी येथील महिंद्रा कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून तालुक्यातील १० महिला बचत गटांना मदत मिळाली आहे. शेतीमाल आणि शेतकरी दृष्टीसमोर ठेवून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मौल्यवान साहाय्य केले आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या माध्यमातून कंपनी करीत असलेले साहाय्य शेतकरी आणि बचत गटांना वरदान आहे.
- शितलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी, इगतपुरी

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!