त्र्यंबक पंचायत समितीच्या शहराबाहेरील प्रस्तावित इमारतीला विरोध ; आदिवासी ग्रामस्थांच्या गैरसोयीत पडणार भर

सुनिल बोडके, इगतपुरीनामा न्यूज, दि. २७

२००२ मध्ये त्र्यंबकेश्वर तालुका अस्तित्वात आल्यानंतर हळूहळू तालुक्याच्या ठिकाणी असलेले सर्व कार्यालये स्थापन होऊ लागली. परंतु  स्वतंत्र इमारत नसल्याने इतर सरकारी इमारतीत शासकीय कारभार हाकला जाऊ लागला. तहसील कार्यालय संत निवृत्तीनाथ महाराज मंदिरा समोरील बचत भवनात तर पंचायत समिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जुन्या इमारतीत सुरू झाली होती. एवढे वर्ष होऊनही तालुक्याला सुसज्ज स्वमालकीची पंचायत समिती इमारत नाही. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे महत्वपूर्ण पंचायत समिती कार्यालयाला जागा नसणे हे तालुक्याच्या जनतेचे दुर्दैवच म्हणावे लागेल. पंचायत समिती इमारतीसाठी जागेची पाहणी करण्यात आली आहे. पंचायत समितीला सुसज्ज इमारत मिळणार असली तरी ही इमारत शहराच्या बाहेर ३ ते  ४ किमी हलवण्याला सर्व स्तरातून विरोध होत आहे.

त्र्यंबकेश्वर हा संपुर्ण तालुका विखुरलेल्या पध्दतीचा आहे. नाशिक,पेठ, इगतपुरी तालुक्याच्या काही गावांचा समावेश करून त्र्यंबकेश्वरची निर्मिती झाली. त्र्यंबकेश्वर तालुक्यात ८४ ग्रामपंचायती व १२५ महसुली गावांचा समावेश आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्याला गुजरात, केंद्रशाशीत दमण, पालघर जिल्हा, पेठ, इगतपुरी व नाशिक तालुक्याच्या सीमा लागतात. ९० टक्के लोकांचा व्यवसाय हा शेतीवर आधारित आहे. देवगाव, त्र्यंबकेश्वर, हरसूल, असे तीन मुख्य टोक पाहायला मिळतात. देवगाव, वावीहर्ष, येल्याचीमेट ते त्र्यंबकेश्वर ५० किमी अंतर तर हरसूलचे ओझरखेड, कास, दावलेश्वर हा भाग त्र्यंबकेश्वर पासून ८० ते ९० किमी  अंतरावर  आहे.  आता एवढ्या लांबुन तालुक्याच्या ठिकाणी काम घेऊन येणाऱ्या माणसाचे काम नाही झाले तर एक  दिवस आसपासच्या नातेवाईकांकडे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी काम झाल्यानंतर घरी जावे लागते. पंचायत समिती त्र्यंबकेश्वर शहराच्या बाहेर हलवली तर नागरीकांना प्रचंड मनस्ताप होणार आहे. याबाबत लोकप्रतिनिधी अनभिज्ञ असल्याचे दाखवत आहेत.

सर्व शासकीय कार्यालये शहरात असताना फक्त पंचायत समिती इमारत शहरा बाहेर  का ?  यामुळे नागरिकांना या कार्यालयातुन त्या कार्यालयात  ये- जा करत शहराच्या बाहेर ४ ते ५ किलो मीटर अनंतरावर असा प्रवास करावा लागेल. मग तालुक्याच्या शेवटच्या टोकापासून येणाऱ्या ओझरखेड, मूलवड, चौरापाडा, रायते, देवडोंगरी, बाफणविहीर, कास, दावलेश्वर  पासून येणाऱ्या लोकांना किती मनस्ताप व त्रास होईल याची कल्पना करणे अवघड आहे.

पंचायत समिती शहरातच असणे गरजेचे आहे. लांबून येणारे नागरिक दिवसभर या ऑफिस मधून त्या ऑफिसात फिरत मारतील का ? लोकांना कोणी येण्या जाण्यासाठी गाड्या उपलब्ध करून देणार आहेत का ? सर्वांच्या दृष्टीने योग्य निर्णय घ्यावा. अन्यथा माकप तीव्र आंदोलन छेडेल.
- इरफान शेख, माकप जिल्हा सेक्रेटरी

पंचायत समिती इमारत ही पेगलवाडी येथे हलवण्यात येणार असल्याचे समजते. परंतु शासकीय इमारतीसाठी आम्हालाच जागा उपलब्ध नसल्याने आम्ही पाच वर्षांपूर्वी ठराव करून प्राथमिक शाळेसाठी जागेची मागणी केली आहे. ती जागा पेगलवाडी ग्रामपंचायतीला देण्यात यावी. जेणेकरून तिथे मुलांसाठी शाळा व इतर शासकीय कार्यलय होतील. आमचा पंचायत समिती येथे येण्याला विरोध आहे.
पांडुरंग आचारी, माजी सरपंच पेगलवाडी

हरसूल पासून आमचं गाव ४०किमी अनंतरांवर आहे. आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जायला ४ तास लागतात. शासकीय काम म्हणजे महीनाभर थांब असे असताना तालुक्याच्या ठिकाणी सर्व कार्यालय आहेत. तिथून जर पंचायत समिती इतरत्र हलवली तर लांबून जाणाऱ्या लाभार्थ्यांना तिथे शासकीय विश्रामगृहाची व्यवस्था करावी. कारण पंचायत समितीच्या कामात आमचे दोन दिवस मोडणार आहेत.
- भाऊ तुंबडे, दिव्यांग ग्रामस्थ, वटकपाडा

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!