जगण्याची कोणतीही व्याख्या असत नाही !

- पुरुषोत्तम आवारे पाटील
दै. अजिंक्य भारत, अकोला
संवाद - 9892162248

व्यापाराच्या क्षेत्रात विक्रीसाठी कशाचाही प्रचार, प्रसार केला जाऊ शकतो. वस्तू, उत्पादन, संकल्पन आणि ज्ञान यांना विक्रीसाठी ठेवले जाऊन त्यासाठी ग्राहकांची झुंबडही उडत आहे. प्रेरणादायी वक्ते बाजारात ज्ञान विक्रीसाठी ठेवत आहेत. त्यातून लोकांना जगण्याची कला शिकविण्याचा मोठा बाजार सुरू आहे. अध्यात्मिक क्षेत्रात रविशंकरसारखे स्वयंघोषित गुरूही ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ बाजार उघडून बसले आहेत. ज्यांच्या एकूणच जगण्यावर लोकांनी बोटे दाखवली आहेत, त्या सगळ्या व्यक्ती अलीकडे लोकांना जगणे शिकवित असतात.
कोरोना काळात घरबसल्या इंटरनेटचा वापर खूप वाढला आहे. लोक तासन्तास या आंतरजालावर सफर करीत असतात. त्यातल्या यू-ट्यूबवर सध्या कुठल्याही विषयावर तुम्हाला मार्गदर्शन मिळते. अगदी रस्त्याने चालावे कसे? मित्रांशी बोलावे कसे? मित्र कसे मिळवावे? कसे टिकवावे? कसे वाढवावे? इथपासून तर जगावे कसे? या इथे पदोपदी उपलब्ध आहेत. तुम्हाला नवल वाटेल पण नेटवर मरावे कसे? यावरसुद्धा मार्गदर्शन करणारे असंख्य व्हिडीओ उपलब्ध आहेत.
बोलण्याची कला, इंग्रजीवर प्रभुत्व, थोडेफार आंतरराष्ट्रीय वाचन आणि काही वेगळ्या लकबी शिकून घेतलेल्या ‘मोटीवेशनल’ स्पीकर्सचा तर यू-ट्यूबवर सुळसुळाट झाला आहे. तुम्ही अशा प्रकारचा एखादा व्हिडीओ शोधायला गेलात तर यू-ट्यूबची टीम तुमच्या पुढ्यात त्याच प्रकारच्या डझनावारी चित्रफितींची लिंक देऊन त्यावर जाण्यास तुम्हाला बाध्य करते. एकदा असे व्हिडीओ बघण्याची सवय लागली की अनुभवाचे काम नाही, सगळे काही शिकता येते असा समज निर्माण होतो. त्यातून लोक जगण्याची व्याख्या शोधायला लागले आहेत. जगणे ही निसर्गदत्त हजेरीची मुद्रा असते. अनुभव तुम्हाला शिकवत जातात, त्याची ठरावीक साचेबद्ध अशी कोणतीच व्याख्या असू शकत नाही हे अशा लोकांना सांगण्याची गरज निर्माण झाली आहे.
अलीकडे निर्माण झालेला प्रत्येक अध्यात्मिक पंथ आपल्या अनुयायांना जगण्याची कला सांगण्याच्या नादात त्याच्या जगण्यावर संपूर्ण नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. गायत्री परिवार, प्रजापिता, राधास्वामी सत्संग, निरंकारी मंडळे, धर्माधिकारी बैठका, रामदासी सत्संग, महानुभाव यांसारख्या शेकडो पंथांमध्ये आपला समाज विभागलेला आहे.
अध्यात्मिक साधना, ईश्वर प्राप्ती हे सगळ्यांचे समान ध्येय जरी असले तरी प्रत्येक पंथाने कोट्यवधी अनुयायी आपल्या नियंत्रणात कसे राहतील यासाठी स्वतंत्र ‘टूलकिट’ तयार केल्या आहेत. त्याचा वापर करून आपापल्या परीने अनुयायांना जगण्याची व्याख्या शिकवली जात आहे. टागोरांना शांतीनिकेतनच्या एका साधकाने जगण्याची नेमकी व्याख्या विचारली तेव्हा टागोर म्हणाले, मला जगण्याची नेमकी व्याख्या गवसली की सर्वात आधी तुला सांगेन. तेच टागोर मृत्यूच्या काही महिने आधी लिहून ठेवतात की माझे जगणे विशाल आणि समृद्ध झाले मात्र एक रुखरुख कायम राहिली, जगण्याची व्याख्याच करता आली नाही. अशाच प्रकारचे शल्य जगातल्या विद्वानांनी मांडून ठेवले आहे.
गाडी, बंगला, गडगंज संपत्ती, पत्नी, मुले यांनाच कृतार्थ जगणे समजणार्‍यांना या प्रकारचे शब्द म्हणजे सणसणीत चपराक समजली जाते. अनुभव आणि लोकांच्या वेदना समजून घेण्याची तृष्णा राजपुत्र सिद्धार्थला भव्य राजप्रासादातून बाहेर काढण्यास कारणीभूत ठरते तरीही गौतम बुद्धांना जगण्याची नेमकी व्याख्या करता येत नाही. अनुभव आणि लोकांच्या वेदनेशी समरस होणे यासाठी जगभरच्या सगळ्या धर्म संस्थापकांचा काळ व्यतीत होऊनही जो जगण्याच्या सीमित अर्थापर्यंत पोहोचू शकले नाहीत अशावेळी आजच्या काळात कुणाला जगण्याचे फसवे अर्थ सांगत त्यांना पथभ्रष्ट करणारे प्रवाह वाढले आहेत.
त्यामुळे जन्माला आलेल्या प्रत्येकाला जगणे समृद्ध आणि विराट करण्याची गरज आहे, व्याख्या शोधण्याची नव्हे. पाचही इंद्रियांनी लोकांच्या जगण्याशी, सुख, दु:खाशी समरस होत अनुभवांचे आदानप्रदान करीत ज्याने विवेकाचा आवाज ऐकला त्याला अशा नसलेल्या व्याख्या शोधण्याची गरज पडत नाही.
माणूस म्हणून गरजा मर्यादित ठेवा, जे आहे त्यात प्रगती करण्यासाठी जिवापाड परिश्रम घ्या, देण्यात अतृप्त राहून घेण्यात समाधानी राहा, जगातल्या कोणत्याही मानवाविषयी पूर्वग्रहाचे मळभ बाजूला सारून मोकळ्या मनाने त्याच्या मदतीला धावून जा. आनंदी राहा आणि तुमच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी स्वत:ला झोकून द्या, मग बघा जगण्याची व्याख्या तुम्हाला शोधता येईल. त्यावेळी कोणत्याही धर्म, पंथ, बुवा, बाबाला शरण जाऊन तुमच्याच अंतरंगात लपलेल्या कस्तुरी गंधाचा पत्ता विचारण्याची तुमच्यावर वेळ येणार नाही. जे योग्य वाटेल ते मनसोक्त करा, ज्याने स्वत:ला त्रास, दु:ख होईल ते इतरांच्या बाबतीत करू नका, तुम्ही कोणत्याही पातळीवर अमानवीय झालात तरी अंतरातला करुणेचा दिवा तेवत ठेवा, त्याच उजेडात जगण्याची व्याख्या दिसेल. ( लेखक दै. अजिंक्य भारत, अकोला ह्या दैनिकाचे संपादक आहेत. )

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!