भाताच्या लावणीसाठी शेतकऱ्यांनी यंत्राचा वापर करा : शितलकुमार तंवर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
यावर्षी समाधानकारक पावसाचा अंदाज व्यक्त केल्याने खरिपासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. इगतपुरी तालुक्यातील सरासरी २६ हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली येते. ह्या खरीप हंगामात यशस्वी ठरलेल्या भात लागवड यंत्राने भाताची लागवड करावी. आपल्या उत्पादन खर्चात बचतीसह उत्पादनात वाढ करावी असे आवाहन इगतपुरीचे तालुका कृषी अधिकारी शितलकुमार तंवर यांनी केले आहे.
गेल्या वर्षी कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर तालुक्यातील उंबरकोन व पाडळी देशमुख येथील २ शेतकऱ्यांना भात लावणी यंत्र उपलब्ध करून दिले आहे. या यंत्राद्वारे तालुक्यातील काही निवडक शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे भात लागवडीचा प्रयोग यशस्वी केला आहे. भात उत्पादकांना दरवर्षी सर्वात मोठा प्रश्न हा लागवडीसाठी मजुरांचा असतो. यासाठी जास्त मजूर लागतात व ही प्रक्रिया वेळ लावणारी आहे. एकाच वेळी येणारी भाताची लागवड यामुळे मजुरांची टंचाई असते. यावर पर्याय म्हणून यंत्राद्वारे भात लागवड करणे आवश्यक आहे. सध्या भाताला मिळणारा बाजारभाव पाहता भात उत्पादक शेतकर्‍यांना उत्पादन खर्चात बचत केल्याशिवाय पर्याय नाही. यंत्राने लागवड केल्यास पारंपरिक लागवडीपेक्षा खर्च कमी येतो व वेळेची बचत होते असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
भात लावणी यंत्राच्या साहाय्याने लागवड करण्यासाठी शेताची योग्य प्रकारे मशागत करणे आवश्‍यक आहे. शेत मातीची ढेकळे व काडीकचरा विरहित असावे. लावणी यंत्राचा योग्य वापर होण्यासाठी चिखलणी ही उथळ व १० ते १५ सेंटिमीटर पर्यंत असावी. यंत्राद्वारे भात लागवडीसाठी विशेष पद्धतीने रोपवाटिका तयार करणे, योग्य प्रकारे मशागत करणे इत्यादीसाठी शेतकर्‍यांनी कृषी विभागाचे मार्गदर्शन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात भात लागवडीसाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करावा. आपल्या उत्पादन खर्चात बचत करून भाताचे उत्पादन वाढवावे. शेतकऱ्यांनी माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संपर्क करावा.
- शितलकुमार तंवर, तालुका कृषी अधिकारी इगतपुरी

यंत्राद्वारे भात लागवडीचे फायदे
१. पारंपरिक पद्धतीपेक्षा बियाणे कमी लागते.
२. रोपांची मर कमी होते.
३. लागवड खर्चात ५० ते ६० टक्के बचत होते.
४. भात उत्पादनात १५ ते २० टक्क्यांनी वाढ होते.
५. मजुरांची संख्या कमी लागते.
६. एका दिवसात ३ ते ४ एकर भात लागवड होते.
७. हव्या त्या अंतरावर लागवड करता येते.
८. या पद्धतीने लागवडीसाठी तयार करण्यात आलेले भात रोप १७ ते १८ दिवसात तयार होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!