पिंपळगाव मोर येथे भैरवनाथ यात्रौत्सव उत्साहात : कोरोनानंतरच्या यात्रेला भाविकांची अलोट मांदियाळी

निलेश काळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. १७

पिंपळगाव मोर येथे कोरोनाच्या वैश्विक महामारीनंतर प्रथमच निर्बंधमुक्त श्री भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाला भाविकांची गर्दी उसळली. गत दोन्हीही वर्षी प्रातिनिधिक स्वरूपात पूजा व फक्त दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी हजेरी लावली होती. यंदा कोरोनाची लाट ओसरल्यावर जंगी स्वरूपात यात्रा पार पडली. सालाबादप्रमाणे ३ दिवस चालणाऱ्या उत्सवात प्रथम दिनी मंदिरात ग्रामदैवतांचे जागरण, दुसऱ्या दिवशी यात्रेनिमित्त काठीची मिरवणूक व तिसऱ्या दिवशी कुस्त्यांची दंगल पार पडली.

काठीच्या मिरवणुकीत घरोघरी काठीची पूजन व प्रत्येक ग्रामस्थ देवाची काठी नाचवतात व मिरवतात. रात्री ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी ‘जगनकुमार सह हौसा वेळवंडकर’ लोकनाट्य तमाशा ठेवण्यात आला होता. तमाशासाठी पंचक्रोशीतील तमाशा प्रेमींनी हजेरी लावली होती. खेळणी, मनोरंजन व खाद्यपदार्थ आदी दुकानदारांनी दुकाने लावून यात्रेची शोभा वाढवली. तरुण यात्रा कमिटीने हिरीरीने व तत्परतेने यात्रेचे नियोजन करून यात्रा आनंदात पार पाडली. ज्येष्ठांनी तरुणांचे तोंडभरून कौतुक केले असून शुभेच्छा दिल्या.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!