सीईटी परीक्षेतील मानसिक क्षमता चाचणीची तयारी कशी कराल ?

मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463

प्रवेश परीक्षा
आज विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी CET ( Common Entrance Test ) सामाईक प्रवेश परीक्षा घेतली जाते. बी.एड. सीईटी, एम. बी. ए. सीईटी, कायदा अभ्यासक्रम, एम. एड़., समाजकार्य आदी अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी या प्रवेश परीक्षा होतात. या परीक्षांमध्ये मानसिक क्षमता चाचणी या घटकावर काही प्रश्न विचारले जातात.

मानसिक क्षमता
तुमच्या कारणमीमांसा क्षमतेचा अंदाज घेणे हा या चाचणीचा मुख्य हेतू आहे. तुम्ही किती जलद आणि अचूक विचार करु शकता हे समजण्यासाठी या चाचणीचा उपयोग होतो. या चाचणीतील प्रश्न शृंखला, अंक मालिका, संख्यामालिका, परस्पर संबंध, कार्यकारण संबंध, सांकेतिकीकरण, नातेसंबंध, वर्गीकरण, निसांकेतिकरण, भाषिक तसेच अभाषिक स्वरूपाचे असतात.

अवघड वाटणारा भाग
सीईटी परीक्षेत विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा हा घटक होय. परंतु गेल्या काही वर्षांच्या प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर या घटकावरील प्रश्न अतिशय सोपे असल्याचे लक्षात येईल. उदाहरणार्थ : डॉक्टर व हॉस्पिटल या दोहोंमध्ये जे नाते आहे तसे नाते दाखविणारी शब्दजोडी निवडा :
. वेटर : उपहारगृह
. शेतकरी : पीक
. वजनकाटा : वस्तुमान
. बंदूक : बार
यांसारख्या प्रश्नामध्ये भाग समग्र संबंध, साहचर्य संबंध, स्थान संबंध, गणिती संबंध अशा प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असतो. वरील प्रश्नात भाग समग्र संबंध आहे. यातील एक घटक दुसऱ्या समग्राचा भाग असतो. हॉस्पिटल या समग्राचा डॉक्टर हा एक घटक आहे. त्याप्रमाणे उपाहारगृह या समग्राचा वेटर हा एक घटक आहे. म्हणून वरील प्रश्नाचे उत्तर ‘‘ हा पर्याय होय.

कार्यकारण संबंध
यावरील प्रश्नांमध्ये पहिला घटक दुसऱ्याचे कारण असतो आणि दुसरा त्यामुळे घडून येणारे कार्य असते.
उदाहरणार्थ : सकाळचे पहाटेशी नाते तसे ………… नाते .
.  तारुण्याचे वृद्धत्वाशी
. संध्याकाळचे अंधाराशी
. वाघाचे मांजराशी
. मुलाचे अर्भकाशी
या प्रश्नाचे योग्य उत्तर ‘‘ हे होय.

विसंगत ओळखा
मानसिक क्षमता या घटकामध्ये किंवा सामान्यज्ञान या घटकामध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. चार पर्यायांपैकी तीन पर्याय एका गटाशी, क्षेत्राशी, गोष्टीशी अथवा घटना, कार्य यांच्याशी संबंधित असतात. राहिलेला एक पर्याय पूर्णतः वेगळा असतो.
उदाहरणार्थ : खालील पर्यायातील विसंगत पर्याय निवडा
. JUDGE
. SCANT
. CROWD
. FLUSH
इंग्रजी भाषेत a, e, i, o, u हे पाच स्वर आहेत. वरील प्रश्नातील ‘‘  पर्यायात U आणि E हे दोन स्वर आहेत. ब , क आणि ड पर्यायामध्ये अनुक्रमे A, O, U हा एकच स्वर आला आहे. म्हणून विसंगत पर्याय ‘‘ हा आहे.

अंकमालिका
या व इतरही अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये याप्रकारचे प्रश्न विचारले जातात. परीक्षेगणिक भाषा बदलते. मांडणी बदलते. संख्या बदलतात.
उदाहरणार्थ : अंक मालिका पूर्ण करा
८, १७, २७, ………. ५०, ६३.
. ३९
. ३८
. ४०
. ३६
येथे ८ + ९ = १७
     १७ + १० = २७
     २७ + ११ = ३८
     ३८ + १२ = ५०
     ५० + १३ = ६३ याप्रकारे रचना आहे. संख्येमध्ये एकाने वाढ होत जाते. वरील अंकमालिकेचे योग्य उत्तर  ‘‘ हे होय.
    
सराव महत्वाचा
मानसिक क्षमता या अभ्यास घटकांवरील प्रश्न सोपे असतात. मात्र हे प्रश्न सोडविण्यासाठी सराव महत्त्वाचा असतो. यासाठी पूर्वीच्या सीईटीच्या विविध परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेतील याप्रकारचे प्रश्न सोडविणे गरजेचे असते. मानसिक क्षमता यावरील प्रश्न आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारे आहेत हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे.

( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )