रचना :- जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ /७०८३२३४०२१
नऊ वाराचं नेसून लुगडं,
झाकत होती आई उदर !
सुवासणीच्या डोक्यावरचा,
ढळत नव्हता कधी पदर !!
नऊवाराचं नेसता हो लुगडं,
मिजास तिचा दिसे हो भारी !
माता भगिनी शोभे आमुची,
भारत जननी माता सुंदरी !!
जगत जननी माझी आई,
गरीब बिचारी होती भोळी !
अंग झाकण्या मायेनं घाली,
बारा छिद्राची धुवेल चोळी !!
फाटेल चोळी भोक सांधण्या,
ठिगळं लावी खण चोळीला !
बारा धुडक्याचं सांधेल लुगडं,
माय गुंडाळी तिच्या अंगाला !!
हळद चिंचोक्याचं लावी कुंकू,
आई मेण मळुनी कपाळाला !
लाल कुंकाचा मळवट भारी,
शोभती आईच्या माथ्याला !!
हाती लेऊनी सौभाग्याचं लेणं,
हिरव्या काच चुडा बांगड्या !
पायी घालती घुंगरी पैंजण,
शोभे भरजरी काट लुगड्या !!
हाती वजनी चांदी पाटल्या,
घालून पंचवीस भाराची !
नाकात घाली गोल नथनी
दोन तोळ्याच्या सोन्याची !!
पिढी घडविण्याचं स्वप्न पाही,
लाडाची माझी जन्मदाती माई !
प्रेमळ मायाळू कष्टकरी देवी,
रुपडं शोभे रुख्मिणी आई !!
ऊब मिळण्या जन्मापासून,
पदराखाली झाकून घेई !
काय वर्णावी तिची महती,
गुरु माझी जन्मदाती आई !!
प्रेमळ भावे भूक भागवी,
कष्टकरी दोन हात आईचे !
ऊब देण्या नऊवार पदरा,
उपकार व्हावेत माईचे !!