
इगतपुरीनामा न्यूज – इगतपुरी तालुक्यातील घोटी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी अपात्र घोषित केल्याचा आदेश नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त निलेश सागर यांनी कायम केला आहे. अनर्ह झालेल्या सरपंच ताई बिन्नोर यांचे अपील फेटाळण्यात येऊन मालेगावचे अप्पर जिल्हाधिकारी यांचा आदेश कायम करण्यात आला आहे याप्रकरणी शिवाजी एकनाथ फोकणे यांनी दाखल केलेल्या निवडणुक विवादनुसार डिसेंबर महिन्यात सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. अप्पर आयुक्तांच्या आदेशाने सौ. बिन्नोर यांची आशा संपुष्टात आली आहे.
यापूर्वी सरपंच ताई बिन्नर यांचे पती आणि सासरे यांच्या नावावर धनादेशाने रक्कम काढल्याचे सिद्ध झाले होते. म्हणून त्यांना उर्वरित काळासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य म्हणून अनर्ह ठरवण्यात आले होते. तत्कालीन थेट सरपंच मंदाकिनी विष्णुपंत गोडसे यांना अपात्र ठरवल्यानंतर ताई बिन्नोर ह्या सरपंच झाल्या होत्या. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने त्या पायउतार झाल्या होत्या. त्यांनी केलेल्या अपीलावर सुनावण्या होऊन आधीचा आदेश कायम झाला आहे.
सरपंच ताई बिन्नोर यांचे पती माणिक बिन्नोर, सासरे निवृत्ती बिन्नोर यांच्या नावावर धनादेशाने ग्रामपंचायतीची रक्कम दिली गेली असल्याचा आरोप शिवाजी एकनाथ फोकणे यांनी केला होता.मालेगावच्या अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यानी प्रस्तुत प्रकरणी दोन्ही पक्षकारांना उचित संधी देऊन सुनावणीचे कामकाज करून सरपंच ताई माणिक बिन्नोर यांना अनर्ह ठरवल्याचा आदेश काढला होता. हा आदेश कायम ठेवण्यात आल्याने परिसरात जोरदार चर्चा सुरु आहे.