
इगतपुरीनामा न्यूज, दि. 28
इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात विजेच्या कडकडाटात आज सायंकाळी प्रचंड वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विविध रब्बी पिकांसह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तोंडचा घास निसर्गाने हिरावून घेतल्याने शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. जनावरांचा चारा सुद्धा भिजला असून उघड्यावरील संसार असणारे संकटात सापडले आहे. ह्या भागातील वीट भट्ट्यांचे सुद्धा मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ह्या भागातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, धामणीचे माजी सरपंच वसंत भोसले यांनी केली आहे.
आज सायंकाळी वादळी वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली. पूर्व भागातील बेलगांव तऱ्हाळे, धामणी, धामणगाव, पिंपळगाव मोर, भरविर, अडसरे, टाकेद, खेड आदी गावांना गारपीटीने फटका बसला. यामुळे टमाटे, कांदा, काकडी, दोडके, कोबी, मका, वालवड, गहू आणि भाजीपाला पिकांचे प्रचंड नुकसान झाले. रब्बी पिकांसह जनांवराचा चाराही भिजला. उघड्यावर असलेल्या संसाराचे मोठे नुकसान झाले. ह्या भागातील वीट भट्ट्यांचे प्रचंड नुकसान झाले. गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे होते ते सर्वच गेले. आता जगायचे कसे, खायचे काय असा प्रश्न पडला आहे. आधीच कोरोनामुळे शेतकरी संकटात आहेत. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत करून आधार द्यावा अशी मागणी माजी उपसभापती पांडुरंग वारुंगसे, धामणीचे माजी सरपंच वसंत भोसले यांनी केली आहे.
