छातीपर्यंतच्या पाण्यातून २० किलो टमाट्याच्या क्रेटची वाहतूक करणाऱ्या “भरत”ला “देव” नदीच्या सेतूची प्रतीक्षाच : पोटासाठी शेतकऱ्याच्या जीवघेण्या कसरतींचा अंत कधी होणार ?

चंद्रकांत जगदाळे : इगतपुरीनामा न्यूज, दि. 19

निफाड तालुक्यातील ब्राह्मणवाडे येथील भरत चिमण घुमरे आणि कुटुंबीय शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. देव नदी काठी त्यांची शेती आहे. या शेतीत राब राब राबून घाम गाळावा आणि घामाचे मोती बनवावे, यात अखे कुटुंबीय व्यस्त असते. परंतु, पावसाळा म्हंटला की घुमरे कुटुंबियांना सरसरून घाम फुटतो. कारण, देव नदी ओलांडून शेतात जाण्यास त्यांना पुलच नाही. तरीही, ‘किनारा तुला पामराला’ म्हणत देव नदीच्या छातीइतक्या पाण्यातून जाऊन शेतीपिके ते बाजारात पोहचवतात. शासन दरबारी देखील प्रश्न मांडले, परंतु काहीही हालचाल झाली नसल्यामुळे घुमरे कुटुंबीय हतबल झाले आहे.

व्हिडिओ बघा

निफाड आणि सिन्नर हद्दीतून जाणारी देव नदी काठी त्यांची गट नं. ६२/६३/६४ मध्ये ते शेती करतात. सध्या टोमॅटोचे पिक त्यांनी घेतले आहे. दैव योगाने भाव आणि पिक जोमदार आले आहेत. परंतु, वाहतुकीसाठी देव नदीवर पूल नसल्यामुळे ‘दैव देतं आणि कर्म नेतं’ अशी त्यांची गत झाली आहे. छातीइतक्या पाण्यातून वीस किलोग्रॅमचे टोमॅटोने भरलेले क्रेट दुसऱ्या बाजूला पोहचविण्याचे दिव्य ते पार पाडत आहेत. रोजचे शंभर क्रेटची वाहतूक ते या पाण्यातून करत आहेत. या कामासाठी अख्य कुटुंबीय तर काम करतंच शिवाय मजूर देखील लावलेले असतात. पिकांना भाव असेल तर या अश्रूंची फुले होतात, नाहीतर हे अश्रू लपवावे लागतात असे त्यांनी बोलतांना सांगितले.

पावसाळापूर्व काळात घुमरे हे प्रत्येक वर्षी या ठिकाणी सिमेंटचे मोठे तीन पाईप टाकतात. त्यावर दगड आणि माती मुरूम त्यावरून टाकत रस्ताला उंची देऊन शेतात जाणे – येणेसाठी रस्ता बनवतात. परंतु, पाण्याच्या प्रवाहापुढे हे काम तकलादू ठरते आणि पूर्वीचेच रडगाणे सुरू होते. गेल्या पन्नास वर्षांपासून या दुष्टचक्रात ते अडकले आहेत. शासन स्तरावरून काही मदत मिळते का, याची चाचपणी देखील त्यांनी केली. त्यात त्यांच्या हाती निराशा लागली. शासन दरबारी तक्रारी करून देखील काहीच हालचाल होत नसल्याने घुमरे कुटुंबीय हताश झालेले आहे. शेती हेच उत्पन्नाचं साधन असल्याने शेती करायची नाही तर खाणार काय ? आणि शेती करायची म्हंटली तर शेतात जायचं कस ? असे दोन्ही प्रश्न त्यांना सतावत आहेत. ‘इगतपुरीनामा’कडे त्यांनी आज कथा मांडली.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!