ज्ञानदानाचे महर्षी “गिरी”तुल्य व्यक्तिमत्व प्रा. देविदास गिरी : चार दशकामध्ये महाराष्ट्रात घडवली गुणवंतांची सुसज्ज फौज

लेखन – भास्कर सोनवणे, संपादक

अन्नदानं पर दानं विद्यादानमत: परम् ।
अन्नेन क्षणिका तृप्ति: यावज्जिवं च विद्यया ॥
अन्नदानामुळे भुकेल्या व्यक्तीला अल्पकाळाची तृप्ती मिळते. मात्र मिळालेल्या योग्य विद्यादानामुळे प्रत्येकाला आयुष्यभराची सुख समृद्धी मिळते. याच प्रकारे आयुष्याच्या जवळपास चार दशकांपासून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे “गिरी”तुल्य व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. देविदास गिरी…सर्वांगीण क्षेत्राचा सूक्ष्म अभ्यास, भाषेवर जबरदस्त प्रभुत्व, कौशल्यदायी अध्यापन आणि प्रभावी लेखन करणारे देविदास गिरी यांना ज्ञानदानाचे महर्षी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. महाराष्ट्रात हजारो ज्ञानपिपासू विद्यार्थ्यांची सुसज्ज फौज उभी करून अध्यापनासह विविध क्षेत्रातील मेरूमणी म्हणूनही ते ओळखले जातात. इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ते उपप्राचार्य म्हणून ३९ वर्षांच्या प्रदिर्घ सेवेतून ३१ मार्चला सेवानिवृत्त होत आहेत. सेवेतून निवृत्ती असली तरी त्यानंतरच्या उर्वरित काळात ते कार्यरत राहणार आहेत. मिळालेल्या पुढील काळात मार्गदर्शन, लेखन, अभ्यास सुरूच ठेवून अनेकांना घडवण्याचे त्यांचे ध्येय ठरलेले आहे.

प्रा. देविदास गिरी यांनी नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण आदिवासी दुर्गम भागांमध्ये उपक्रमशिल प्राध्यापक म्हणून काम केले. हे करतांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासह त्यांच्या समस्या व अध्ययनातील अडचणींचा अभ्यास केला. विद्यार्थीप्रिय शिक्षक हा सर्वात मोठा पुरस्कार ते समजत असले तरी विविध राज्य आणि जिल्हास्तरीय पुरस्काराने त्यांचा गौरव झालेला आहे. महाविद्यालयातील प्रत्येक उपक्रमात नावीन्यपूर्ण सहभाग घेऊन अध्यापनाबरोबरच विविध स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यामुळे निबंध, वक्तृत्व, वादविवाद, लेखन आदी स्पर्धांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना यशाचा मुलमंत्र मिळाला. महाराष्ट्रातील अनेक स्पर्धांचे परीक्षक म्हणून काम केले. सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य संशोधन, शैक्षणिक, धार्मिक संस्था आणि त्यांच्या उपक्रमांमध्ये सहभाग घेत सामाजिक बांधिलकीचा वस्तुपाठ निर्माण केला. आकाशवाणी केंद्रावरून गाजलेल्या प्रश्नमंजूषा उपक्रमाचे लेखन, सादरीकरण केल्यामुळे महाराष्ट्रभर त्यांचा वेगळा श्रोता, वाचकवर्ग आहे.

स्पर्धा परीक्षा, व्यक्तिमत्व विकास यावरील त्यांची व्याख्याने मंत्रमुग्ध करतात. महाराष्ट्रभर एमपीएससी, यूपीएससी, बँक परीक्षा, रेल्वे परीक्षा, स्टाफ सिलेक्शन कमिशन, सेट नेट, जेआरएफ परीक्षा, बीएड, सीईटी अशा विविध परीक्षांसाठी त्यांनी केलेले मार्गदर्शन यशाचा राजमार्ग मिळवणारे ठरले. या परीक्षांसाठी मराठी, राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास विषयांच्या १४ अभ्यासपूर्ण पुस्तकांचे त्यांनी लेखन केले आहे. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत सुयश मिळवण्यासाठी या पुस्तकांचा उपयोग झाला. यामुळे शेकडो विद्यार्थ्यांमधून प्राध्यापक, संशोधक, शिक्षक, अधिकारी, म्हणून घडले आहेत. राज्यातील विविध दैनिके, मासिके यामध्ये अनेक विषयांवर प्रा. गिरी यांचे वाचकप्रिय लेख व लेखमाला प्रकाशित झालेल्या आहेत. महाराष्ट्रातील १०० कवींच्या कविता असणारा “काव्यगुंफा” प्रातिनिधिक काव्यसंग्रह आणि नवोदितांच्या लेखनाला प्रसिद्धी मिळण्यासाठी “उमलत्या भावनांचा शोध” नियत‌कालिकाचे संपादन केले. भारत जोडो अभियान स्मरणिका, कलावंत सूची पुस्तिका यांचेही त्यांनी संपादन केले. ज्ञानदान क्षेत्रातील अत्युच्च कामगिरी करणारे महर्षी प्रा. देविदास गिरी यांना सेवानिवृत्तीच्या निमित्ताने पुढील कामगिरीसाठी भरभरून शुभेच्छा..!

Similar Posts

error: Content is protected !!