मराठी भाषा समृद्ध बनवण्याची प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी – रवींद्र मालुंजकर

इगतपुरीनामा न्यूज, दि. २६

कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यामध्ये कुसुमाग्रजांची साहित्यसंपदा नवोदितांसाठी दिशा व प्रेरणा देणारी आहे. म्हणूनच साहित्य नव्याने लिहिले गेले. आपल्या साहित्याची खरी सुरुवात महानुभाव साहित्यापासून झाली. समाज घडविण्यासह भाषेच्या समृद्धीसाठी मुकुंदराजांनी, संतांनी केलेले कार्य हे अतुलनीय आहे. पोवाडा, लावण्या, कविता, बखर अशा विविध प्रकारच्या साहित्यातून समाज प्रबोधन होत असते. साहित्यिक होण्याअगोदर चांगला आदर्श माणूस व्हा आणि व्यसनापासून दूर राहा असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे रवींद्र मालुंजकर यांनी केले.

मविप्र समाजाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे मराठी विभागाच्यावतीने ‘मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून कवी रविंद्र मालुंजकर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. के. शिंदे होते. अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले की खरा साहित्यिक हा ग्रामीण भागातूनच घडतो. कारण ग्रामीण भागातून लोक साहित्याची परंपरा पूर्वीपासून आजपर्यंत विकसित होत आलेली आहे. म्हणूनच रामदास फुटाणे, विठ्ठल वाघ, इंद्रजीत भालेराव अशा वेगवेगळ्या नवीन कवींमुळे मराठी साहित्याच्या दालनात भर पडलेली आहे. यावेळी डिजीटल ग्रंथालयाचे उदघाटन कवी रविंद्र मालुंजकर यांच्या हस्ते झाले. ग्रंथालय प्रमुख डॉ. वर्षा जुन्नरे यांचे सहकार्य लाभले. प्राध्यापक, विद्यार्थी वर्ग यांनी ग्रंथालयातील प्रदर्शनाचा लाभ घेतला. प्रास्ताविक डॉ. संदीप माळी यांनी तर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय मराठी विभाग प्रमुख डॉ. अशोक भवर यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. ललिता सोनवणे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. शरद कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाप्रसंगी सर्व प्राध्यापक वर्ग, प्राध्यापकेतर वर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!