राजाभाऊ वाजे यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीची वज्रमूठ : पदाधिकारी आणि कार्यकर्ते विजयासाठी “मशाल” घेऊन सरसावले

भास्कर सोनवणे । इगतपुरीनामा न्यूज  : नाशिक लोकसभा मतदार संघातील विजयी उमेदवाराला निर्णायक मतांची आघाडी देणारा इगतपुरी विधानसभा मतदार संघ असल्याचा इतिहास आहे. टाकेद जिल्हा परिषद गट सिन्नर विधानसभा मतदार संघाला तर त्र्यंबकेश्वर तालुका इगतपुरीला जोडलेला आहे. त्यातच त्र्यंबकेश्वर तालुक्यातही भौगोलिक दृष्ट्या दोन भाग निर्माण झालेले आहेत. विविध आदिवासी जमातींचे प्राबल्य, मराठा बांधव, दलित, मुस्लिम बांधवांची मतपेटी आदींचा सारासार विचार करणे क्रमप्राप्त ठरते. लोकसभा निवडणुकीचा धुरळा आता रंगात येऊ लागला आहे. शिवसेना ( उबाठा ), इंदिरा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी इगतपुरी तालुक्यात प्रचाराची चांगलीच आघाडी घेतली आहे. विद्यमान काँग्रेस आमदार हिरामण खोसकर, दोन टर्मच्या माजी आमदार शिवसेना उपनेत्या निर्मला गावित, लोकसभा समन्वयक निवृत्ती पाटील जाधव, विधानसभा समन्वयक भगवान आडोळे, तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, काँग्रेस नेते लकी जाधव, राष्ट्रवादी शरद पवार गट पदाधिकारी आदींनी मतदार संघ पिंजून काढला आहे. या सर्वांची वज्रमुठ राजाभाऊ वाजे यांना लोकसभेत पाठवण्यासाठी कार्यरत झाली आहे. इगतपुरीतुन सध्यातरी राजाभाऊ वाजे यांची मशाल चांगलीच तेवत असल्याने संभाव्य लढत दुरंगीच होईल अशी चिन्हे आहेत. शिवसेना शिंदे गट, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार निश्चितीचा घोळ राजाभाऊ वाजे यांच्या पथ्यावर पडत आहे. निवडणुकीला अजून बराचा कालावधी असल्याने स्पष्ट कल यायलाही अवकाश आहे. 

राजाभाऊ वाजे यांच्या विजयासाठी आजी माजी आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्य, सहकारी पक्षांचे पदाधिकारी सरसावले आहेत. काँग्रेस आमदारांनीही आपली शक्ती लावून राजाभाऊ वाजे यांचा विजय प्रतिष्ठेचा केला आहे. टाकेद, नांदगाव सदो, शिरसाठे, वाडीवऱ्हे, घोटी जिल्हा परिषद गट आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातुन निर्णायक आघाडी मिळवण्यासाठी सूत्रबद्ध नियोजन असल्याचे दिसत आहे. इतर भागातही अधिकाधिक मतांचे दान मिळवण्यासाठी महाविकास आघाडीचे कौशल्य पणाला लागेल. टाकेद जिल्हा परिषद गटात घराघरात मशाल पोहोचवण्यासाठी ताकद लावली जाते आहे. तर नांदगाव सदो गट, इगतपुरी शहरात उबाठा शिवसेनेचे पारडे जड आहे. महाविकास आघाडीच्या एकत्रित मतांची संख्या विजयासाठी निर्णायक ठरणार असून अधिकाधिक मतांची आघाडी देण्यासाठी इगतपुरी मतदारसंघ उपयुक्त ठरू शकतो. मुस्लिम आणि दलित बांधव कोणाच्या पारड्यात मते टाकतात ह्यावरही बरेच काही अवलंबून आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा उमेदवार निश्चित झाल्यास लढतीचे खरे चित्र पहायला मिळेल.

विधानसभेचे गणित 
आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी मिळावी विद्यमान आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार निर्मला गावित, काँग्रेस नेते लकी जाधव प्रयत्नशील असण्याची शक्यता आहे. त्यानुसार आपल्या हक्काच्या मतांची ताकद राजाभाऊ वाजे यांच्याकडे वळवण्यासाठी सर्वजण कृतिशील दिसत आहेत. या सर्वांकडून आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी व्युहरचना करणे सुलभ व्हावे म्हणून एका अर्थाने लोकसभेच्या निमित्ताने विधानसभेची रंगीत तालीम घेतली जात आहे. निवडणूक जशी जवळ येईल तसे राजकीय डाव टाकले जाऊन मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांची कसोटी लागेल ह्यात शंका नाही.

Similar Posts

error: Content is protected !!