खदखदणाऱ्या भावनांची वाट मोकळी करुन सदैव व्यक्त होत रहा – देविदास खडताळे : टाकेद येथे बहारदार कविसंमेलन संपन्न

नवनाथ गायकर : इगतपुरीनामा न्यूज, दि. २५

मानवी मनात विचारांचे आंदोलन सतत सुरु असते. या मनात खदखदणाऱ्या भावनांना वाट करुन द्यायला हवी. अन्यथा मनाचा कोंडमारा होतो. म्हणुनच माणसाने सातत्याने व्यक्त होऊन भावनांचा निचरा करावा. यासाठी कविता हे सर्वात सोपे व सुलभ माध्यम आहे असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे यांनी केले. जागतिक मराठी भाषा दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनियर काॕलेज टाकेद ता. इगतपुरी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हा व टाकेद माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निमंत्रित कवी संमेलनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद नाशिक जिल्हाध्यक्ष तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हाध्यक्ष नवनाथ अर्जुन पा. गायकर, कवी नारायण गडाख सिन्नर, कवी योगेश थोरात, प्राचार्य टि. जी. साबळे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा कायदेशीर सल्लागार अँड. संदीप गंभीरे, शाहबाज शेख, शांताराम भांगे, दिलीप बांबळे, राजेंद्र गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष नवनाथ गायकर यांनी मराठी भाषेची महती वर्णन करताना या भाषेत अन्य भाषाचीं भेसळ होऊन मराठी भाषा मोठ्या प्रमाणात अशुद्ध झाल्याची खंत व्यक्त केली. मराठी भाषा संवर्धनासाठी प्रत्येक मराठी भाषिकानीं शुद्ध मराठीत बोलण्याचा संकल्प करावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. कवी नारायण गडाख यांनी विविध विषयांवर कविता सादर केल्या तर कवी योगेश थोरात यांनी लग्न ही कविता सादर केली. कवी राजेंद्र गायकवाड यांनी ही कवितेच्या माध्यमातून पहिले प्रेम व्यक्त केले तर गावाकडे चल माझ्या दोस्ता या कवितेचं विडंबन करत परिसरातील असुविधेवर प्रहार करत माझ्या गावाकडे नको येऊ दोस्ता ही कविता सादर केली. विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे अनेक कविता सादर करत कार्यक्रमात रंगत आणली. परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास खडताळे यांच्या वाढदिवसानिमित्त तीन गटात खुल्या कविता स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. यातील पहिल्या तीन क्रमांकावर विजेत्या ठरलेल्या बाल व कुमार कवींचा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते झाला. स्वागताध्यक्ष प्राचार्य साबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. सुत्रसंचालन धोंगडे यांनी तर आभार राजेंद्र गायकवाड यांनी मानले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!