इगतपुरीनामा न्यूज, दि. २६
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रमुख मागणीसाठी आज खासदार छत्रपती संभाजीराजे मुंबईच्या आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी इगतपुरी तालुक्यातील शेकडो कुटुंब मुंबईकडे रवाना झाले आहेत. यासह नाशिक जिल्ह्यातल्या विविध तालुक्यातील आणि लगतच्या जिल्ह्यातील मराठा बांधवांनी मुंबईकडे जाण्यासाठी गर्दी केली. इगतपुरी तालुक्यातील मराठा समाजाने या मार्गावरून येणाऱ्या बांधवांना चहा नाश्ता देण्याची व्यवस्था केली.
मराठा आरक्षणाचा मुद्दा न्याय प्रविष्ठ झाल्यानंतर मराठा समाजाला न्याय मिळण्यास होणारा विलंब लक्षात घेऊन खा. संभाजी राजें छत्रपती यांनी राज्य आणि केंद्र सरकारला मराठा समाजाचे उभय सरकारांच्या हातात असलेले मुद्दे सोडवून दिलासा देण्याचा प्रस्ताव दिला होता. केवळ प्रस्ताव देऊन छत्रपती शांत बसले नाहीत तर निवडक पाच सहा मुद्दे काढून त्याची अंमलबजावणी सरकारने केली तरी मराठा समाजाचे बहुतांश प्रश्न मार्गी लागू शकतात अशी यामागची राजेंची प्रामाणिक भूमिका होती आणि आहे. राज्य शासनाने राजेंनी दिलेला प्रस्ताव स्वीकारला. राजेंसह क्रांती मोर्चा सोबत बैठकी झाल्या. आश्वासने दिली गेली. घोषणाही झाल्या. राजेंनी दिलेला प्रस्ताव किती व्यावहारिक आहे याचा अभ्यास करण्यासाठी भोसले समितीही स्थापन झाली. भोसले समितीनेही अभ्यास करून राजेंच्या प्रस्तावाला व्यावहारिक म्हणून स्वीकारण्याची शिफारस राज्य सरकारला केली. तथापि राज्य सरकारकडून केवळ शाब्दिक आश्वासनापलीकडे कुठलीही ठोस अंमलबजावणी झाली नाही. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची पत वाढवून बेरोजगार तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करणे, सारथीसारखी संस्था सक्षम करून त्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांसाठी मराठा तरुण पात्र बनविणे, तसेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले आणि न्यायालयाने निर्देशीत केलेल्या मराठा उमेदवारांना तात्काळ पूर्वलक्षी नियुक्त्या देणे, कोपर्डीच्या भगिनीला न्याय देण्यासाठी पूर्व निकालाला दिले गेलेले आव्हान खोडून काढण्यासाठी न्यायिक प्रक्रियेला वेग देणे अशा निवडक मुद्यावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा एव्हढीच खा. संभाजी राजें आणि सकल मराठा समाजाची मागणी आहे. या साध्या मागण्याही राज्य सरकार केराच्या टोपलीत टाकीत असल्याने राजेंनी टोकाची भूमिका घेत आज 26 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आमरण उपोषण करताना अनेक आंदोलनात भाजलेल्या मराठा समाजाला आणखी वेठीस धरायचे नाही, या प्रामाणिक भूमिकेतून ते एकटेच आमरण उपोषण करणार अशी भूमिका त्यांनी जाहीर केली असली तरी मराठा समाज या आंदोलनात सहकुटुंब सहभागी होऊन राज्य सरकारला धडा शिकविणार असल्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा बांधव कुटुंबासह आझाद मैदानावर उपस्थित राहून राजेंसोबत आंदोलनात सहभागी होण्यासाठी घोटी टोलनाक्यावरून निघाले आहेत.