गरज ऑनलाइन शिक्षण साक्षरतेची!

लेखक – मा. श्री. काकासाहेब वाळुंजकर – निवृत्त प्राचार्य, रयत शिक्षण संस्था, सातारा

महाराष्ट्राच्या शैक्षणिक जडणघडणीत अनेक लहान मोठ्या शिक्षण संस्था शिक्षणशास्त्री सामाजिक राजकीय सुधारकी धुरिणांबरोबरच शासन, अधिकारी व जनतेचा मोठा सहभाग राहिला आहे.

अगदी प्रौढ साक्षरता प्रसारासाठी अक्षरधारा व रात्रीचे प्रौढ शिक्षण वर्ग गावागावातून चालवले गेले. ही शैक्षणिक चळवळ सामुदायिकरित्या प्रशिक्षित वर्गाकडून चालवली गेली. व यातूनच महाराष्ट्र साक्षरतेचे उद्दिष्ट गाठू शकला.

सन 2009 च्या आरटीई अधिनियमामुळे सक्तीच्या सार्वत्रिक शिक्षणात शैक्षणिक परिवर्तन घडवून आले यातून शैक्षणिक उठाव झाला.महाराष्ट्र देशात पुढे गणला गेला. नवीन शैक्षणिक धोरणे आखताना शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. व त्याचा फायदा अध्ययन अध्यापन करताना निश्चितच झालेला दिसून आला. ज्या शिक्षकाला प्रशिक्षणाची गरज आहे त्याने ती मागणी करावी अशी तरतूद करण्यात आली.

सध्या महाराष्ट्र राज्यापुरता विचार केल्यास कोविड 19 च्या उद्रेकामुळे शैक्षणिक क्षेत्रात अनेक स्थित्यंतरे होताना दिसत आहेत.शाळा बंद पण शिक्षण चालू हा उद्घोष होत असताना ऑनलाईन शिक्षणाचा बोलबाला होत आहे. सार्वत्रिक व सक्तीचे शिक्षण जसे झोपडीपर्यंत गेले तसे ऑनलाईन शिक्षणासाठी प्रयत्न अभावानेच झाले असे म्हणावे लागेल.त्याची अनेक कारणे आहेत. कारण डिजिटल भारत होत असताना शैक्षणिक क्षेत्राकडे काही अंशी डोळे झाक होताना दिसते. आजही अनेक शाळांमध्ये ऑनलाईन पूर्णपणे पोहोचताना दिसत नाही. कोरोना संसर्गाच्या अगोदर ऑनलाईन हे फार मर्यादित स्वरूपात होते. कारण मुलांसमोर शिक्षकच होते. शालेयस्तरांवरील संगणकीय लॅब मधून शालेय तासिकेला असे शिक्षण दिले जाई यात काही शहरी भागातील सुसज्ज शाळा अपवाद असू शकतील की ज्यांनी मोठ्याप्रमाणात ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब केला असेल पण काही ग्रामीण, दुर्गम भागात अनेक अडचणी समस्यांतून मार्ग काढीत लोकसहभागातून शिक्षण संस्था, शिक्षक यांच्या प्रयत्नातून शिक्षण दिले जात आहे तर काही शिक्षकांनी सुरक्षित अंतर व योग्य ती काळजी घेत मर्यादित मुलांचे वर्ग पालकांच्या परवानगीने सुरू केले आहेत.

ऑनलाइन शिक्षण आवश्यकच
कालसापेक्षतेनुसार बदल हा हवाच आहे. पण आज आपल्यावर बाका प्रसंग आला आहे त्यामुळे आपण ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग स्वीकारण्याशिवाय गत्यंतर नव्हते. कारण कोरोना संसर्गाने प्राथमिकच्या वर्गांपासून ते महाविद्यालयीनपर्यंतच्या वर्गांच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. शाळाही लाॅकडाऊनमध्ये अडकल्या त्यामुळे हाती असलेला ऑनलाईन शिक्षणाचा एकमेव मार्ग न निवडून काय करता? वर्ष झाले ऑनलाईन शिक्षणाने कुणास जगवले कुणास तारले कुणा मारले कुणी तालेवारही झाले.

आज एकही सामाजिक ,मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यम नाही की जिथे ऑनलाईनची बरी वाईट चर्चा होत नाही. मग व्हाट्सअप पासून यू ट्यूब ते झूम गुगल मीट व टीव्ही वरीलही चॅनल्सपर्यंत या शिक्षणाचा मुलांवर एवढा भडिमार चालू आहे की परिणाम काय होतात हे समोर येईलच ! ऑनलाइन योग्य मार्गाने, सुयोग्य पद्धतीने व पाहिजे त्यांना पाहिजे त्या प्रमाणात मिळते आहे की नाही हे अजमावण्याची काय यंत्रणा आहे? खरेच ते गरजूंपर्यंत जाते आहे का? याची खात्री करण्याची वस्तुनिष्ठ यंत्रणा आज आपल्याकडे नाही असेच म्हणावे लागेल.

प्रशिक्षणाशिवाय शिक्षण
आज अनेक ॶॅपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण चालू आहे ज्यांनी ही साधने व ॶॅप यापूर्वी हाताळली त्यांचा काही प्रश्न नाही पण असे अनेक शिक्षक पालक विद्यार्थी व अधिकारी आहेत की जे या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या कार्यपद्धतीबाबत अनभिज्ञ आहेत.मग हे लोक ही माध्यमे कशी हाताळणार! केवळ व्हाट्स अप वरील अवघे आलेले मेसेज फाॅरवर्ड करण्याइतपत ज्ञान असलेल्यांनी ऑनलाइनशी कसे लढावे? जे पालक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात त्यांनी उदरभरण करावे की ऑनलाईन मुलांशेजारी बसावे आणि बसले तरी “अक्षर भैंस बराबर!” काय करणार! कशी मदत करणार! ही प्राथमिक माहिती असणे गरजेचे आहे, ती आहे असे समजून कसे चालेल? ही माहिती नसल्यानेच मुले व पालक यापासून दूर जाऊ शकतात.

काही ठरावीक शिक्षकच ही माध्यमे हाताळण्यात सक्षम आहेत.बाकीच्यांचे काय? व्हाट्स अप समूहांतील काही शिक्षक सरळ मेसेज टाकतात अमूक पाठाचा व्हिडिओ पाठवा. तमूकचे ते पाठवा इत्यादी. मग जी मुले अशा शिक्षकांसमोर ऑनलाइन आहेत त्यांची काय अवस्था असेल? यासाठी ऑनलाईन साधने हाताळण्याचे प्रशिक्षण किंवा माहिती तरी असणे गरजेचे आहे.

अडचणी दुर्लक्षून कसे चालेल?
अडचणींचा डोंगर आणि ऑनलाइन मोबाईल फोन तोही स्मार्ट ,ऍन्ड्राइड , लॅपटॉप, टॅब, संगणक हे ज्यावर चालतात ती ऊर्जा, इंटरनेट, रेंज आणि हे ऑनलाईन सुरू ठेवण्यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ म्हणजे नेटपॅक मारण्यासाठी लागणारे आर्थिक बळ ही पण मूळ समस्या आहे. सर्वांकडेच अशी साधने आहेत असे समजून हे शिक्षण चालू आहे पण एकाच घरात दोन पेक्षा अधिक मुले वेगवेगळ्या वर्गात शिक्षण घेत आहेत व एकच मोबाइल आहे. याचे ऑनलाइन शिकण्याचे , वेळेचे नियोजन कोणी केले? किती शिक्षक व संस्था शाळांनी केले असेल असे वाटत नाही व केलेही असेल तर या राहिलेल्यांच्या ऑनलाइनचे काय? खरेच यांचा वास्तव सर्वे हाती आहे का? यानिमित्ताने अनेक प्रश्न निरुत्तरीत राहू शकतात.

पालकांना यातील अजिबात काही माहिती नाही असेही पालक असतील ते खरेच ऑनलाईन काय चालले आहे ही मुले अभ्यासच करतात की गेम खेळतात की आणखी काही हे कसे समजणार? आणि मदतही कशी करणार?

छोटी बालके व ऑनलाईन शिक्षण
पहिली ते चौथीच्या मुलांचा विचार केला तर ही मुले समोर शिक्षक असताना आवरणे कठीण तर ऑनलाईन कशी आवरणार! खरेच यांना हे दिले जाणारे शिक्षण पचनी पडत असेल का? आई-वडील या बालकांना ऑनलाइन रमवू शकतील का? की धाक-धपटशा लावून फक्त उपस्थित ठेवू शकतील! खरे तर यांना हवीत फक्त मोबाईलवर निरनिराळी रंगीत चित्रे, झाडे झुडपे, खेळ गमती- जमती, कार्टुन, चैतन्यपट, निरनिराळे भौमितिक आकार, मनोरंजक छोटे संवाद, गाणी,इत्यादी नकला! इथे आई किंवा आजी ऑनलाईन आणि ते मूल मात्र निद्राधीन! असे कंटाळवाणे शिक्षण या वयातील मुलांना कसे आकर्षित करू शकेल?

वरचे ऑनलाईन वेगळेच!
वरच्या वर्गातील मुलांची वेगळीच तर्‍हा झूमवर शिक्षक ऑनलाईन शिकवतात आणि मुले लेट जाॅईन होणे, विचित्र आवाज काढणे स्क्रीनवर रेघोट्या ओढणे, मधूनच निघून जाणे अक्षरशः असे नको ते प्रकार चालू असतात. अशा मुलांवर नियंत्रण ठेवणे शिक्षकांना शक्य नसते व पालक ही कामानिमित्त, नोकरीवर निघून गेलेले असतात. किंवा मुले ऑनलाईन आहेत म्हणून डिस्टर्ब करीत नाहीत व गरजू मुले यापासून वंचित आहेत.

साचेबंद मूल्यमापन टेस्ट
अनेकदा या चाचण्यांचे विशिष्ट साॅफ्टवेअर अगोदरच तयार केलेले असते. त्याबाहेर जाऊन मूल्यमापन करता येत नाही. चूक की बरोबर, योग्य पर्याय निवडा, गटात न बसणारा शब्द निवडा, विशिष्ट काळ ओळखा, अशा प्रकारची दहा वीस गुणांची परीक्षा मुले काही मिनिटांतच सोडवतात. अध्ययन निष्पत्तीचे उद्दिष्ट बाजूलाच राहते. मुक्तोत्तरी ,आकलनक्षम ,दीर्घोत्तरी वैचारिक, तार्किक असे प्रश्न, कृती सोडवून घेण्यास मर्यादा पडतात. एक साचेबंदपणा येत जातो.

अभ्यासक्रम नियोजन
ऑनलाइन शिक्षण व त्याचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापनाचे निश्चित नियोजन हवे, एक सूत्रबद्ध कार्यक्रम हवा. वेळापत्रक हवे. मुलांना सोयीची असलेली वेळ असावी. मुलांना ऑनलाइन साधने व पर्यायी गरजा सुविधा ह्या महत्त्वाच्या, त्याची तरतूद हवी. महत्त्वाचे म्हणजे शिक्षक पालकांना या साधनांची व निरनिराळ्या ऍपची माहिती हवी. अनेक टी व्ही चॅनलवर इयत्तावार जरी ऑनलाईन सुरू करण्यात आले असले तरी अनुषंगिक सोयी सुविधा असणे गरजेचे आहेच. तरच हे शक्य आहे. सह्याद्री वाहिनी आहे पण लाईटच्या वेळेचे गणित ठीक नाही. जिओ साठी आणखी वेगळीच सुविधा हवी. असे असताना शेवटच्या मुलांपर्यंत असे शिक्षण जाऊ शकेल असे शिक्षण हवे अन्यथा ऑनलाइन भरडल्यासारखे होऊ शकते.

संवेदनशील मुलांचा विचार
आपण पाहतो अनेक घटना बातम्या येतात की मुलांनी मोबाईल नाही घरची अडचण आहे. यातून वाढलेल्या न्यूनगंडातून किंवा ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही म्हणून आपल्या जीवाचे बरेवाईट केले अशा संवेदनशील मुलांचा यात विचार करणे पण महत्त्वाचे आहेच. कारण असे शिक्षण संपवून शाळा नियमित सुरू होतील पण जाणारे जीव मात्र पुन्हा येणार नाहीत. हे समुपदेशन ही फार गरजेचे आहे.

शाळा कधी सुरू होतील याचा निश्चित अंदाज नाही आणि झाल्या तरी किती पालक मुलांना शाळेत पाठवण्याचे धाडस करतील हा मोठा प्रश्न आहे. प्रत्येक शाळेत मुलांची कटाक्षाने काळजी घेणारी सक्षम यंत्रणा असेलच असे नाही. व यातून अघटित काही घटना घडल्या तर त्याची जबाबदारी कोण घेणार हा प्रश्नही आहे. आणि ठरावीक मुले ठरावीक वर्ग बोलावून शिकवणे हे पण शक्य होईल असे नाही. एकूण अनेक अडचणीतून मार्ग काढीत पुढे जावे लागेल. अजूनही ही लोकांमध्ये सामाजिक सुरक्षित शारीरिक अंतर ठेवणे, मास्क घालणे हात धुणे, सॅनिटाझर वापरणे यांचे शहाणपण, समज यायला वेळ लागेल अशा कठीण परिस्थितीत ऑनलाईन व शालेय शिक्षण पुढे जाणार आहे. अचानक आलेले संकट असले तरी फार मोठी जबाबदारी शालेय घटकांवर आहे. अभ्यासक्रम हा मागील इयता व मागील पाठांना अनुसरून तयार केलेला असतो त्यामुळे काही प्रमाणात तो कमी केला असला तरी शिकवतांना मागील संदर्भ टाळून शिक्षकांना अध्यापन टाळता येणार नाही ते संदर्भ द्यावेच लागतील. यासाठी वेळ ही द्यावा लागेल.

ऑनलाइन किती योग्य, किती अयोग्य, किती हाती आले, किती गमावले यापेक्षा ही शाळा दीर्घ काळ बंद असतानाची ही सुरूवात म्हणजे निरंतर शिक्षणाची नांदी आहे. यातून सर्वांनाच शिकायला मिळाले . यापुढे हे शिक्षण शालेय जीवनाचा एक भाग बनेल हे मात्र खरे! पण ऑनलाइन साक्षरता टाळून चालणार नाही कारण उद्या शिक्षकाच्या नोकरीसाठी ही अट जाणीवपूर्वक लावली जाऊ शकते.

(लेखक निवृत्त प्राचार्य असून सध्या रयत शिक्षण संस्थेचे सहाय्यक विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.)

Similar Posts

2 Comments

  1. avatar
    Mustakim Pathan says:

    अतिशय छान ! साहेब, आपण ऑनलाईन शिक्षण विषयावर विविधांगी प्रकाश टाकलेला आहे.
    It’s Really Thought Provoking Article.
    – प्रा. मुस्तकीम पठाण ( वाळकी )

Leave a Reply

error: Content is protected !!