इगतपुरीनामा न्यूज, दि. २१
( उत्तम गायकर यांजकडून )
२३ मार्च या दिवशी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी भारतभुमीच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. ह्या शहीद दिनाचे स्मरण करण्यासाठी २८ राज्य ८ केंद्रशासित प्रदेश, आणि १ हजार ५०० स्थळावर ९० हजार रक्तदाते महान रक्तदान कार्यात सहभागी होत आहे . २३ मार्चला इगतपुरी तालुक्यातील आशाकिरणवाडी वाघेरे ( मोगरे फाटा ) येथे हा कार्यक्रम होत आहे.
ह्या कार्यक्रमात प्रत्येक रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी स्वाक्षरी केलेले संगणकीकृत प्रमाणपत्र दिले जाईल. ह्या रक्तदान शिबीराची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणार आहे. ह्या उपक्रमाला शहीद भगतसिंग यांचे भाचे अभयसिंग सांडु, शहीद राजगुरु यांचे पुतणे सत्यशील राजगुरु, शहीद सुखदेव यांचे नातु अनुज थापर व शहीद अश्फाकउल्ला खान यांचे नातू अश्फाकउल्ला खान यांचे आशीर्वाद लाभले आहेत. गायक कैलास खेर, शिव खेर, अभिनेता सोनू सूद, गुरदास मान, रणदीप हुडा, करण राझदान, मोहन जोशी खयाली सहरान,भायचुंग भुतिया, मिस अनिता कुंडू, जसलाल प्रधान, इस्तर हनमते, जेजी लेपाखिवा, अशोक हांडे यासारखे दिग्गज ह्या सत्कार्यात सहभागी झाले आहे.
हे रक्तदान शिबिर सरकारी यंत्रणेद्वारे होणार असून रक्तदात्यांनी मंगळवारी २३ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ ते १ वाजेपर्यंत आशाकिरणवाडी वाघेरे ( मोगरे फाटा ) येथे उपस्थित राहुन सहभागी होण्याचे कळवण्यात आले आहे.
या शहीददिनी आपल्या संवेदना जागृत ठेवून व कोरोना काळातील शासन प्रशासनाचा सूचना व दिशादर्शक तत्त्वांनुसार रक्तदान करण्याचे आवाहन पंचायत समितीचे सभापती सोमनाथ जोशी, सोमजचे सरपंच मच्छिंद्र कुंदे, माजी सरपंच मोहन भोर, मोगरेचे सरपंच गोविंद जाखेरे, मनसे तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, सुरेश जाधव, समनेरेचे सरपंच साहेबराव जाधव, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारघडे, भारत सरकार व महाराष्ट्र शासन पुरस्कृत कलावंत शाहीर उत्तम गायकर यांनी केले आहे.