इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
वेळ आज संध्याकाळी साधारण साडेपाच वाजेची…शाळा सुटायची झालेली वेळ आणि आपल्या मुलांना घ्यायला येणारे पालक, गाड्या यांची गर्दी अन वर्दळ. इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कुल आणि नूतन मराठी शाळेत वंदेमातरम् संपल्यानंतर शाळा सुटल्याची घंटा वाजली. विद्यार्थी एकमेव प्रवेशद्वाराने जाण्यासाठी त्या दिशेने घरी जायला निघाले. तेवढ्यात अचानक शाळेच्या प्रवेशद्वारावर गुलमोहराचे झाड अचानक कोसळले. अन कोसळलं तेही एका विजेच्या खांबावर…जवळच उभे असलेले पालक अर्जुन कोळेकर यांनी हे झाड कोसळतांना पाहिले. याचवेळी काही विद्यार्थिनींना त्याखालून जात असताना त्यांनी पाहिले. तातडीने त्यांनी तिथून जाणाऱ्या त्या मुलींना खाली बसण्यास सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर फक्त झाडाच्या फांद्या आल्या. यामुळे त्यांचे प्राण वाचले. एका मुलीस फक्त किरकोळ दुखापत झाली. तिथून जाणाऱ्या मुलींना तात्काळ थांबवत कोळेकर यांनी शाळेच्या शिक्षकांना पाचारण केले. तोपर्यंत तारेतील विद्युत प्रवाह गेटमध्ये उतरला होता. शिक्षकांनी तात्काळ महावितरणला संपर्क साधून याबाबत कल्पना दिली. त्यामुळे तात्काळ विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. शेकडो विद्यार्थ्यांचा जीव कोळेकर यांच्या दक्षतेमुळे बचावला. महावितरण व नगरपरिषदेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून झाड व विद्युत पोल हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पालकांनी अर्जुन कोळेकर यांची कृतज्ञता व्यक्त केली आहे. इगतपुरी तालुक्यातील शाळांच्या जवळ असणाऱ्या धोकादायक झाडांची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी पालकांनी केली आहे.