लेखन : पत्रकार निलेश गौतम, डांगसौंदाणे
कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणुन नावलौकिक असलेल्या बागलाण काँग्रेसला मात्र आता खंबीर नेतृत्वाअभावी अवकळा आलेली आहे. दिवसेंगणिक पक्ष कमजोर होत असल्याने खरे काँग्रेस समर्थक मात्र आता या नेतृत्वाला कंटाळले आहेत. पक्षात मोठ्या प्रमाणावर फेर बदल झाला तरच आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसह नगरपरिषद निवडणुकीत पक्ष जिवंत राहू शकेल. अन्यथा पक्षाची वाताहत झाल्याशिवाय राहणार नाही. पक्षाकडे अनेक प्रभावी तरुण चेहरे असतांना पक्षाने गेली अनेक वर्षे तालुका निवासी नसलेल्यांना पक्षाचे तालुकाध्यक्ष करून पक्षासह कार्यकर्त्यांची वाताहत केल्याचे दिसते.
या परिस्थितीत आगामी निवडणुकीत पक्षाला भरघोस यश मिळवायचे असल्यास पक्षाला खंबीर नेतृत्वासह स्थानिक नेतृत्वाला प्रवाहात आणून मोठी जबाबदारी द्यावी लागणार आहे. सद्यस्थितीत पक्षाकडे एक जिल्हा परिषद सदस्य तर दोन पंचायत समिती सदस्य असल्याने तालुक्याचा विचार करता हे संख्याबळ अतिशय तोकडे आहे. अशा परिस्थितीत पक्षाला वेळ आणि कार्यकर्त्यांना न्याय देणारा तालुकाध्यक्ष असला तर भविष्यात येणाऱ्या निवडणुकीत आपले अस्तित्व टिकवून ठेवता येणार आहे. अन्यथा पक्षाला मोठे अपयश येण्याचे जाणकार कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे.
कायम सक्रिय कार्यकर्त्यांमध्ये प्रा. अनिल पाटील, शहराध्यक्ष किशोर कदम, नाशिक जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन कोठावदे, नगरसेवक राहुल सोनवणे, पंचायत समिती सदस्य रामदास सूर्यवंशी, संजय जोपळे, जि. प. सदस्य रेखा पवार, भास्कर परशुराम अहिरे, सोमनाथ सूर्यवंशी, नारायण सावंत, प्रवीण सावंत, दिनेश कापडणीस, रेखा अहिरे हे चळवळीत राहणारे चेहरे आहे. पक्षाशी कायम प्रामाणिक असणारे यशवंत बापू अहिरे, विजय पाटील, प्रल्हाद पाटील, यशवंत पाटील, राघो अहिरे, अभिमन सोनवणे, गुलाबराव कापडणीस, पंडितराव मोरे, नारायण खैरनार, राजाराम गांगुर्डे, उत्तरा सोनवणे, सुरेखा पगार यांच्या सारखे मार्गदर्शक आहेत. मात्र गेली अनेक वर्षे स्थानिक नेतृत्व आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला विसंवाद मात्र पक्षाला बळकटी देऊ शकला नाही.
मधल्या काळात पक्षाची मोठी हानी झाली आहे. मात्र यातून वरिष्ठ पक्ष नेतृत्व बोध घेत नाही. परिणामी आगामी काळात पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेल्या कसमादेतच जर पक्ष कमजोर झाला तर याला जबाबदार कोण ? असा ही काहीसा सवाल आता सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्ता विचारताना दिसत आहे. येणाऱ्या निवडणुकीत जर तालुक्याची जबाबदारी एखाद्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या हातात गेली नाही तर पक्षाची तालुक्यातील होणारी वाताहत कोणीही टाळू शकत नाही. विद्यमान आमदार खासदार भाजपाचे तर माजी आमदार राष्ट्रवादीचे असल्याने आगामी काळात दोघा मातब्बर पक्षांशी टक्कर देणारा तालुकाध्यक्ष आणि दमदार कार्यकर्त्यांची फळी उभी न केल्यास मोठे राजकीय नुकसान काँग्रेस पक्षाला सोसावे लागणार आहे हे नक्की…!