महामार्गांवर भटक्या कुत्र्यांची संख्या वाढल्याने अपघातांची संख्या वाढली : गोंदे जवळ अपघातात सुरगाणा तालुक्यातील २ युवक गंभीर जखमी

इगतपुरीनामा न्यूज, दि. 20

मुंबई आग्रा महामार्गांवर ठिकठिकाणी भटक्या कुत्र्यांची संख्या भरमसाठ वाढली असून यासोबत छोट्या मोठ्या अपघातांची संख्याही वाढते आहे. अचानक आडवे जाणे, अचानक मोटारसायकलचा पाठलाग करणे यामुळे वाहनधारक भीतीच्या वातावरणात आहेत. ह्या मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. दरम्यान नाशिकहुन इगतपुरीच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला अचानक कुत्रे आडवे गेल्यामुळे गोंदे दुमाला येथील लिअर कंपनी जवळ अपघात झाला. आज सकाळी झालेल्या या अपघातात 2 युवक गंभीर जखमी झाले आहेत. MH 15 FH 3494 ह्या मोटारसायकलवरील जगदिश लक्ष्मण भोये वय 23, दिनेश रामदास गवळी वय 26 दोघे रा. बोरीपाडा ता. सुरगाणा हे गंभीर जखमी झाले. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानिज धाम मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णमित्र निवृत्ती पाटील गुंड यांनी समयसुचकतेने अपघातस्थळी दाखल होऊन जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.