सोशल नेटवर्किंग फोरमच्या ग्रामीण वाचनालयासाठी साडेतीन लाख रुपयांची मदत

इगतपुरीनामा न्यूज दि. २३ : सोशल नेटवर्किंग फोरम ही सामाजिक संस्था आदिवासी भागातील विविध मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी गेली दहा वर्षे सातत्याने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. फोरमचे हे सातत्याने सुरू असलेले मदतकार्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान यामुळे प्रेरीत होवून डेल्टा फिनोकेम प्रा. लि. चे संस्थापक आणि रोटरी क्लबचे माजी प्रांतपाल दादा देशमुख यांनी फोरमला तीन लाख साठ हजार रुपयांची मदत धनादेशाद्वारे केली आहे. या रकमेतून लवकरच सुरगाणा तालुक्यातील हरणगाव आणि घागबारी या दोन गावांमध्ये वाचनालय सुरू केले जाणार आहे अशी माहिती सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी दिली आहे. सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असलेले देशमुख सरांसारखे मोठे व्यक्तिमत्व फोरमला मार्गदर्शक म्हणून लाभले ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

लोकसहभागातून एखादा सामाजिक उपक्रम राबवायचा म्हटला की निधीची उपलब्धता, इतर गोष्टींची जुळवाजुळव करतांना असंख्य अडचणी येतात. “गाव तिथे एसएनएफ वाचनालय” हा उपक्रम राबवतांनाही अनेक अडचणी आल्या. संबंधित गावाने वाचनालयासाठी खोली उपलब्ध करून दिली असली तरी आवश्यक फर्निचर आणि पुस्तके यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. मात्र एकदा पुढाकार घेतल्यावर मदतीच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो हा अनुभव असल्याने फोरम ने ही वाचनालय मोहीम सातत्याने पुढे सुरू ठेवली आहे. दहा महिन्यांच्या कालावधीत आतापर्यंत दहा दुर्गम गावांमध्ये सोशल नेटवर्किंग फोरम ने वाचनालय सुरू केले आहे. शाळकरी मुलांपासून ते कॉलेज आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत अनेक विद्यार्थी या वाचनालयाचा नियमित लाभ घेत आहेत. सोशल नेटवर्किंग फोरमने शंभर गावांमध्ये अशी शंभर वाचनालये सुरू करण्याचा संकल्प केला असून या कामात अनेक वैयक्तीक देणगीदार आणि संस्था पाठीशी भक्कमपणे उभे असल्यानेच हे शिवधनुष्य पेलण्याचे बळ मिळते असे गायकवाड यांनी आवर्जून सांगितले.

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!