मार्गदर्शक : मधुकर घायदार, संपादक शिक्षक ध्येय
उदिष्टे : पारंपारिक शिक्षणात पदवीधर झाल्यानंतर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नसल्यामुळे इंजिनिअरींग डिप्लोमा (पदविका ) करण्याकडे विद्यार्थ्यांचा कल सध्या वाढत आहे. कुशल इंजिनीअर तयार करणे तसेच विद्यार्थ्यांना स्वयंरोजगारला लावणे हे तंत्रनिकेतनचे उदिष्ट आहे.
व्याप्ती : राज्यात प्रत्येक जिल्हाच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी शासकीय तसेच खासगी तंत्रनिकेतने आहेत. राज्यात एकूण ३७८ शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतने आहेत. यात सुमारे ४० प्रकारच्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. यातील प्रथम वर्ष प्रवेशासाठी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये 17 हजार 759 तर खासगी तंत्रनिकेतनमध्ये 90 हजार 282 जागा उपलब्ध आहेत. थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी 387 तंत्रनिकेतनमध्ये 82 हजार 275 जागा उपलब्ध आहेत.
शैक्षणिक अर्हता : 35 टक्के गुणांसह इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यास पदविकेच्या प्रथम वर्षात प्रवेश मिळतो. इयत्ता बारावी विज्ञान/टेक्निकल/व्होकेशनल विषय घेऊन उत्तीर्ण झाल्यास किंवा दोन वर्षाचा आयटीआय अभ्यासक्रम केल्यानंतर थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळतो.
कालावधी : पदविका अभ्यासक्रमांचा कालावधी तीन वर्षाचा असून पदविकानंतर सीईटी/जेईई यासारखी कोणतीही प्रवेश परीक्षा न देता थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी शाखेत ( इंजिनिअरिंग पदवी ) प्रवेश घेता येतो.
आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, दहावीची गुणपत्रिका, द्वितीय वर्षात प्रवेश घ्यायचा असल्यास बारावी/आयटीआयची गुणपत्रिका, जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, दिव्यांग/सैन्यदल/अल्पसंख्यांक प्रमाणपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, इत्यादी.
उपलब्ध अभ्यासक्रम : तंत्रनिकेतनमधील सर्व अभ्यासक्रम तीन वर्षांचे आहेत. त्यात स्थापत्य, यंत्र, विद्युत, संगणक, अणुविद्युत, माहिती तंत्रज्ञान, रसायन, खनिकर्म, वस्त्रनिर्माण, ड्रेस डिझायनिंग, उत्पादन, प्रिंटींग, उपकरणीकरण आदींसारखे सुमारे 40 प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
आरक्षण व सुविधा : पदविका अभ्यासक्रमांत सरकारी नियमाप्रमाणे प्रत्येक प्रवर्गासाठी तसेच मुलींना 3० टक्के आरक्षणही ठेवण्यात आले आहे. तसेच माध्यमिक शाळेतच व्यवसाय शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदविकाच्या सर्व अभ्यासक्रमांत 15 टक्के आरक्षण ठेवण्यात आले आहे. प्रशिक्षणार्थीना प्रवर्गानुसार वार्षिक वसतिगृह निर्वाह भत्ता ८००० ते ३०००० रुपये असतो. एस टी सवलत पास, वैद्यकीय सुविधा, आदी. देण्यात येतो. https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज केल्यास अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी 25000 रुपये शिष्यवृत्ती मिळते.
प्रवेश प्रक्रिया व संकेतस्थळ : राज्यातील पदविका प्रवेशासाठी शासनामार्फत ऑनलाईन सामायिक प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. त्यामुळे प्रत्येक तंत्रनिकेतनसाठी वेगळा अर्ज करण्याची आवश्यकता नसते. शासकीय/खासगी तंत्रनिकेतनची यादी आणि अभ्यासक्रमानुसार शैक्षणिक पात्रता, इतर नियम www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर दहावी निकालानंतर उपलब्ध असते.
तंत्रनिकेतन डिप्लोमा इन इंजिनिअरिंग प्रवेश माहितीपुस्तिका : https://drive.google.com/file/d/1WPAqq-uJ94ZOQIUFJJxIIo_3Y2reP9Z7/view?usp=drivesdk यावर उपलब्ध आहे.
संधी व फायदे : सरकारी किंवा खासगी क्षेत्रात कनिष्ठ अभियंता/निरीक्षक म्हणून नोकरी मिळू शकते. किंवा स्वतःचा व्यवसाय सुरु करता येतो. अभियंता पदविका उत्तीर्ण विद्यार्थ्यास खासगी कंपन्यांसह महावितरण, एमआयडीसीमधील कारखान्यांमध्ये अनेक प्रकारचे रोजगार उपलब्ध आहे. तंत्रनिकेतनमधील कँपस इंटरव्हूच्या माध्यमांतून नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. सरासरी वार्षिक पाच ते आठ लाख रुपये विदेशात पगार दिला जातो. मुंबई, पुणे, नाशिक येथील कंपन्यांमध्ये अनुभवानुसार प्रतिमाह पंधरा ते चाळीस हजार रुपयांपर्यंत पगार दिला जातो.