कल्याण, कसारा, इगतपुरी दरम्यान रेल्वे गाड्यांतील निकृष्ट खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करा :  जागरूक प्रवाशांची मागणी

किशोर देहाडे, इगतपुरीनामा न्यूज, दि. १८

कोरोनामुळे रेल्वे गाड्यांतून गेल्या दीड वर्षांपासून सर्वसामान्य जनतेला प्रवास करण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. सध्या फक्त अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचारी वर्गांकरीता परवानगी देण्यात आली आहे. अधिकृत ओळख पत्र असल्या शिवाय प्रवाशांना तिकीट देण्यात येत नाहीत. असे असताना इगतपुरी व कसारा रेल्वे स्थानकांतुन अनाधिकृत बाहेरील फेरीवाले चालत्या मेल – एक्सप्रेस मध्ये बेकायदेशीरपणे विविध प्रकारचे व्यवसाय करत आहे. कोणाच्या आशिर्वादाने ते बेधडकपणे धंदा करतात हा एक यक्षप्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

अधिक वृत असे की कोरोना काळात शासनाने सर्वसाधारण व्यक्तीला रेल्वे गाडीतून प्रवास करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही रेल्वेच्या कल्याण, कसारा व इगतपुरी रेल्वे स्थानकांतुन अनाधिकृत बाहेरील फेरीवाले चालत्या मेल- एक्सप्रेस मध्ये बेकायदेशीर घुसून राजरोसपणे विविध प्रकारचा व्यवसाय (धंदा) करत आहेत. विशेष म्हणजे या फेरीवाल्यांकडे कुठल्याही प्रकारचा धंदा करण्याचा अधिकृत परवाना नाही. हे अनाधिकृत फेरीवाले कुठल्याही प्रकारची सावधानता बाळगत नाही. यांच्या तोंडावर मास्क सुद्धा नसतो. अशा बेजबाबदार फेरीवाल्यांमुळे आटोक्यात आलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे.

चालत्या रेल्वे गाडीच्या डब्यांमध्ये तसेच कल्याण, कसारा, इगतपुरी रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस व रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात असताना सुध्दा हे अनाधिकृत फेरीवाले मेल-एक्सप्रेस मध्ये प्रवेश करतातच कसे हा मोठा यक्षप्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. अत्यंत हलक्या निकृष्ट प्रतीचे मनुके, वाळलेली खजूर अत्यंत हलक्या स्वरुपाचे आहे. या सुक्यामेव्याची कुठल्याही प्रकारची वैद्यकीय चाचणी होत नाही. त्यामुळे रेल्वे गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खोटे बोलून त्याची लुबाडणूक होत आहे.

निकृष्ट दर्जाचे बेदाणे व खारीक खाऊन विविध रोगांना आमंत्रित दिल्या सारखेच असून कित्येक प्रवाशांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोरोना महामारीच्या शासकीय नियमांचे पालन न करणाऱ्या व बेजबाबदार पणे मेल-एक्सप्रेस मधील प्रवाशांच्या जीवाशी खेळणा-या अनधिकृत फेरीवाल्यांवर रेल्वेच्या नियमानुसार  कायदेशीर कारवाई करण्यात यावी. बेकायदेशीर चालणारे धंदे बंद करण्यात यावे अशी मागणी जागरूक प्रवाशांनी केली आहे.