मद्य तस्करी करणारे पुरवठादार एलसीबीच्या जाळ्यात : मद्य तस्करी करणारा हस्तक आशिष फिरोदिया अटक ; ६६ लाखांचा अवैध मद्यसाठा हस्तगत

इगतपुरीनामा न्यूज – निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर ५ एप्रिलला नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई आग्रा महामार्गावर सोग्रस फाटा परिसरात गोवा राज्य निर्मित मद्याची विनापरवाना बेकायदेशीररित्या तस्करी करणाऱ्या ट्रकवर छापा टाकला. त्यामध्ये ४३ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त केल्याप्रकरणी वडनेर भैरव येथे गुन्हा दाखल आहे. ह्या गुन्ह्यात एका आरोपीस अटक करण्यात आली होती. त्याच्या ट्रकमधून गोवा राज्य निर्मित रॉयल ब्ल्यु व्हिस्की ४४८ बॉक्सचा ४३ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला होता. आरोपी पदमसिंग बजाज हा गोव्यातुन मद्यसाठा ट्रकमध्ये भरून मुंबई आग्रा महामार्गाने गुजरातला घेवुन जाणार असल्याचे तपासात समोर आले होते. अधिक चौकशीत त्याने हे मद्य हे गोव्यातील महेश शेठ व बिलाल यांच्या सांगण्यावरून नाशिकच्या आशिष फिरोदिया शेठ यांच्या मार्फत त्यांच्या आर्या ट्रान्सपोर्ट वाहनातून गुजरातला राजु शेठकडे पाठवण्यात येणार असल्याचे तपासात समोर आले आहे. ह्या प्रकरणातील परराज्यातील अवैध मद्य तस्करीची पाळेमुळे नष्ट करून मुख्य आरोपींना तातडीने अटक करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस पथकांना तपासकामी गोवा व राजस्थानमध्ये रवाना करण्यात आले होते. स्थागुशाचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने गोव्यात जुना गोवा परिसरातील गोवा कर्नाटक महामार्गावर सतत तीन दिवस पाळत ठेवुन यातील मद्याचा पुरवठा करणाऱ्या गुन्हेगारांना महामार्गावर सिनेस्टाईल पाठलाग करून शिताफीने ताब्यात घेतले आहे. महेशकुमार भुरालाल तन्ना, वय ५८, मुळ रा. राजश्री टॉवर, सॅटलाईट, अहमदाबाद, गुजरात, हल्ली – मार्टीन एनक्लीव्ह, मिरामार, पणजीम, गोवा. (गोवा राज्य निर्मित मद्य पुरवठादार), बिलाल उर्फ अदनान सैफुद्दीन मन्सुरी, वय २८, मुळ रा. जमजम सोसायटी, ओलपाड, सुरत, गुजरात, हल्ली – मार्टीन एनक्लीव्ह, मिरामार, पणजीम, गोवा. (गोवा राज्य निर्मित मद्य तस्करी मॅनेजर ) यातील आरोपी मद्य पुरवठादार महेशकुमार तन्ना हा गोवा राज्य निर्मित व मर्यादीत असलेला मद्यसाठा हा नाशिकच्या आशिष शेठ फिरोदीया मार्फत महाराष्ट्र व गुजरातला तस्करी करीत असल्याचे तपासात समोर आले आहे. यातील आरोपी आशिष फिरोदीया याला नाशिकच्या गंगापुर रोड परिसरातुन ताब्यात घेण्यात आले आहे. आशिष अमरचंद फिरोदीया, वय ५३, रा. ३०३, प्रियंका ब्लॉसम, सिरीन मिडोज, गंगापुर रोड, नाशिक यातील आरोपी आशिष फिरोदीया हा अवैध मद्य तस्करीमधील परराज्यातील साथीदारांसह नेटवर्क चालवून नाशिकसह गुजरातला मद्याची तस्करी करत होता. जिल्ह्यात परराज्यातुन असलेले अवैध मद्याचे नेटवर्क समूळ उच्चाटन करण्यासाठी ग्रामीण पोलीसांची पथके सत्वर कारवाई करत असून महेश तन्ना याचा नाशकातील हस्तक आशिष फिरोदीया याच्या अटकेमुळे मद्य तस्करीची राज्यातील पाळेमुळे खोदण्यास पोलिसांना मदत होणार आहे.

यातील आरोपी क्र. १ आणि ३ यांना वडनेर भैरव पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यात अटक असून न्यायालयाने त्यांना १४ दिवस कोठडी दिली आहे. तपासात २३ लाख ४ हजार किंमतीची रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे आणखी २४० बॉक्सचा अवैध मद्यसाठा हस्तगत करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शिंदे हे करीत आहे. ह्या गुन्ह्यातील उर्वरित आरोपींचा पोलीस पथक कसोशीने शोध घेत असुन मद्य तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. यातील ताब्यात घेतलेल्या आरोपींविरुध्द विविध राज्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. नाशिक परीक्षेत्र पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील, ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, पोलीस निरीक्षक संदिप मंडलीक, स्थागुशाचे सपोनि गणेश शिंदे, पोउनि नाना शिरोळे, पोहवा नवनाथ सानप, संदिप नागपुरे, मेघराज जाधव, हेमंत गरूड, पोना विश्वनाथ काकड, हेमंत नवले, प्रदिप बहिरम, विशाल आव्हाड, मनोज सानप, कुणाल मोरे, प्रविण गांगुर्डे, चालक तानाजी झुरडे यांच्या पथकाने ह्या प्रकरणी उत्तम कारवाई केली आहे.

error: Content is protected !!