काँग्रेस कार्यकर्त्यांकडून नूतन तालुकाध्यक्षांचे जोरदार स्वागत
इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
लोकनेते स्व. गोपाळराव गुळवे यांच्या सानिध्यात राजकारण, समाजकारण आणि विकासाचा सुवर्णमध्य साधणारे रमेश सदाशिव जाधव यांची निवड इगतपुरी तालुका इंदिरा काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी करतांना अत्यानंद होत आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे यांच्यासह जेष्ठ निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांच्या समन्वयाने आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकण्याचे कसब रमेश जाधव यांच्या माध्यमातून होणार आहे. पक्षाची विचारधारा जनमानसात रुजवण्यासाठी नव्या तालुकाध्यक्षांना भरभरून शुभेच्छा देतो असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केले. इगतपुरी तालुका काँग्रेसचा बालेकिल्ला असून ह्याला अभेद्य ठेवण्यासाठी समावेशक विचारधारेद्वारे खंबीर साथ देईल असे नवनियुक्त तालुकाध्यक्ष रमेश जाधव यावेळी म्हणाले. आमदार हिरामण खोसकर म्हणाले की, स्व. दादासाहेब गुळवे यांच्यासह काँग्रेसवर अभेद्य निष्ठा असणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाकडून इगतपुरी तालुक्यात मोठे काम उभे राहणार असल्याची खात्री वाटते.
स्व. लोकनेते गोपाळराव गुळवे यांनी शिकवलेल्या विचारधारेला प्रमाण मानून तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी आजपासून घेतली आहे. गावागावात संपर्क अभियान राबवून पक्षाला अधिकाधिक मजबूत करण्यात येईल. सर्वांच्या विचारांचा आदर करून ग्रामीण भागात लोकांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी नियोजन केले जाईल. सर्वमान्य आणि सर्वसमावेशक विचारांनी सुसंवाद साधून कामगिरी पूर्ण करण्याचे मी अभिवचन देतो.
- रमेश सदाशिव जाधव, नूतन तालुकाध्यक्ष इंदिरा काँग्रेस
मुंबई येथील प्रदेश काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रमेश सदाशिव जाधव यांची इगतपुरी तालुका इंदिरा काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी नियुक्ती केली. यावेळी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, काँग्रेस नेते ॲड. संदीप गुळवे, अनुसूचित जाती जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष गोपाळ लहांगे, माजी सभापती रामदास बाबा मालुंजकर, आदी पदाधिकारी हजर होते. रमेश सदाशिव जाधव हे गोंदे दुमाला औद्योगिक वसाहत ग्रामपंचायतीचे माजी सरपंच असून त्यांनी गोंदे दुमाला सोसायटीचे चेअरमनपद सुद्धा भूषविलेले आहे. गोंदे परिसरातील औद्योगिक नगरी विकासाच्या उंबरठ्यावर असतांना त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. सरपंच पदाच्या कारकिर्दीत विकासाच्या अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत. सामंजस्य, संयम, जिद्द, संघर्ष, निष्ठा, धडपड ह्या गुणांच्या आधारावर जनमानसात त्यांच्या कार्याचा आलेख नेहमीच चर्चिला जातो. तालुकाध्यक्ष पदावर निवड झाल्याने त्यांच्या निष्ठेला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असून विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एका छताखाली आणण्यात त्यांची भूमिका मौल्यवान ठरणार आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमेश जाधव यांच्या निवडीला अनन्यसाधारण महत्व असून याचे दृश्य परिणाम निश्चितच फायदेशीर ठरतील असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
तालुकाध्यक्ष पदावर निष्ठावंत कार्यकर्त्याला पक्षाने संधी दिल्याने मनापासून आनंद झाला. निरपेक्ष, प्रामाणिक, सोज्वळ व्यक्तिमत्व असणारे रमेश जाधव यांच्या निवडीमुळे तालुका काँग्रेसमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सर्वांच्या मनात असणारे व्यक्तिमत्व ह्या पदावर विराजमान झाल्याने आम्हा सर्वांना अतीव आनंद होत आहे.
- शांताराम पाटील कोकणे, जेष्ठ काँग्रेस नेते