घोटीच्या रणरागिणी मथुरा जाधव यांची संघर्ष कथा महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनीची निर्मिती 

इगतपुरीनामा न्यूज, दि. १०
आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने सुरुवातीपासून ‘ती’च्या वाट्याला संघर्ष आला. मात्र ती खचली नाही. गरिबी, आजारपण अशी अनेक संकटे झेलत गेली. पुढे रोजगार म्हणून ‘अन्नपूर्णा महिला बचत गट’ स्थापन केला. त्यातून महिलांचे व्यावसायिक संघटन वाढत गेले. अन त्यातूनच ‘विमेन्स पॉवर फार्मर्स प्रोड्युसर कंपनी’ नावाने कंपनीही सुरू केली. हा प्रवास आहे इगतपुरी तालुक्यातील घोटी येथील मथुरा तानाजी जाधव यांच्या संघर्ष अन जिद्दीचा.
१९९९ ते २००४ दरम्यान त्या ग्रामपंचायत सदस्य होत्या. कौटुंबिक जबाबदारी सांभाळत असताना शेतीही करत. पती तानाजी जाधव हे ग्रामपंचायत कर्मचारी. त्यांना मर्यादित वेतन होते. त्यामुळे आर्थिक स्रोत वाढविण्यासाठी त्यांनी जबाबदारी घेतली. दरम्यानच्या काळात त्यांना रोजगाराच्या संधीबाबत माहिती मिळाली. त्यातूनच २००६ साली अन्नपूर्णा महिला बचत गटाची स्थापना झाली. पुढे २००९ साली हातसडीच्या तांदळाचे उत्पादन अन विक्री या कामाची सुरुवात झाली. महिलांकडून कायमस्वरूपी रोजगाराची मागणी होऊ लागली. यावर त्यांनी कामासंबंधी विस्तारावर भर दिला. 
बचत गटाच्या माध्यमातून २००८ ते २०१० पर्यंत म्हैसपालन, याशिवाय मागील वर्षापर्यंत सेंद्रिय गूळ उत्पादन व विक्रीही केली. सध्या वाळवण प्रकारात नागली पापड, नागली सत्व, भरडलेल्या विविध प्रकारच्या डाळी, १७ प्रकारचे धान्यापासून दळून-भाजून थालीपीठ, भाजणी पीठ, हिरवा मसाला अशी प्रमुख उत्पादने आहेत. ही उत्पादने ग्राहकांच्या पसंदीस उतरली आहेत. विविध प्रदर्शनाच्या माध्यमातून उत्पादित मालाची नवी मुंबई व ठाणे येथे विक्री त्या करतात. यापूर्वी महालक्ष्मी सरस प्रदर्शनात १० लाखांची उलाढाल यशस्वीपणे केली आहे. 

ही आहेत वैशिष्ट्ये
१५ महिलांना वर्षभर रोजगार
■ हंगामी प्रति महिना ५ लाखांपर्यंत तर वार्षिक १५ लाखांवर उलाढाल
■ आदिवासी,विधवा व गरजू महिलांना हक्काचा रोजगार
■ आदिवासी महिलांकडून उत्पादित भाताची खरेदी 

महिलांची शेतकरी उत्पादक कंपनीची निर्मिती
कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने त्यांना प्रेरणा मिळत केली. त्यातूनच महिलांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपनी उभी राहिली आहे. कंपनीचे १० संचालक आहेत. चालू वर्षी २५० महिला सभासद जोडणीचे उद्दिष्ट ठरविले आहे. या माध्यमातून तयार उत्पादनाचे ब्रँडिंग करून व्यावसायिक उभारणी करत महिलांचे अर्थकारण अजून सक्षम कसे होईल यासाठी त्या प्रयत्नशील असल्याचे त्या सांगतात.  

■ रोजगार निर्मितीतून स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारला आहे. संकटे आली अन त्यांनी शिकवलं त्यातूनच हे कष्टाने उभं राहिलं. कष्ट अन जिद्दीतून दोन्ही मुले इंजिनिअर बनविली आहेत. आता महिलांच्या माध्यमातून काम करत विधायक कार्य उभे करून महिलांना उभे करायचे आहे.
मथुरा तानाजी जाधव, घोटी

( दै. सकाळ अँग्रोवन यांच्या सौजन्याने )

सौ. मथुरा तानाजी जाधव

Similar Posts

Leave a Reply

error: Content is protected !!