इगतपुरीनामा न्यूज, दि. ९
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महत्वाच्या उप जिल्हा रूग्णालयात महीलादिनीच गर्भवती महिलेला दिवसभर उपजिल्हा रुग्णालयात बसवून ठेवण्यात आले. यासह तिच्याकडे दुर्लक्ष करत प्रसूती न करता सात तासानंतर नाशिक येथे सिव्हील येथे पाठवण्यात आले. महिलादिनीच गरिब आदिवासी महिलेची हेळसांड झाली असल्याने संबंधित आरोग्य यंत्रणेवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी आमदार हिरामण खोसकर यांच्याकडे केली आहे.
सोमवारी ( दि. ८ ) रोजी सकाळी ११ वाजता तारा पिंटु वारे ही आदिवासी महीला प्रसुतीसाठी त्र्यंबकेश्वर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल झाली. तिला सात तास फक्त बसुन ठेवत आमच्याकडे कोणतेही सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण देण्यात आले. येथे उपस्थित असलेले डाॅ. प्रशांत पाटील यांनी कोणतेही उपचार न करता तारा वारे हिला नाशिक येथे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्याच्या सुचना दिल्या. प्रत्यक्षात रूग्णवाहीका रात्री ८ वाजता आली. नाशिक येथे पाठविण्यात आल्यानंतर तिची नॉर्मल प्रसूती झाली. त्र्यंबकेश्वर येथील उपजिल्हा रुग्णालय शोभेची वस्तु आहे का ? असा सवाल सर्वसामान्य विचारत आहे.
या अगोदर सुध्दा वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने रुग्ण तपासणी झाली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे आरोग्य अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा दशावतार दिसुन आला होता. उपजिल्हा रूग्णालयात कर्मचाऱ्यांकडून कामकाज करतांना ग्रामस्थांना अरेरावी आदी नेहमीच्या तक्रारी आहेत. कामकाजात सुधारणा होत असल्याने आमदार हिरामण खोसकर यांनी यात लक्ष घालण्याची मागणी चंदर मेंगाळ यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
शिष्टमंडळाने घेतली वैद्यकीय अधिकाऱ्यांची भेट
महिलादिनीच आदिवासी गर्भवती महिलेची हेळसांड झाल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस हरिभाऊ बोडके, रामभाऊ मुळाणे, युवक काँग्रेसचे रोहीत सकाळे, अजित सकाळे यांनी वैद्यकीय अधिकारी डाॅ. मंदा बर्वे यांची मंगळवारी सकाळी भेट घेतली. झालेल्या प्रकाराबाबत नाराजी व्यक्त करत डाॅ. दिलीप पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करत येथील आरोग्य व्यवस्थेच्या तक्रारीचा पाढा वाचला. येथे असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा तक्ता लावण्याची मागणी केली. यावेळी झालेल्या गैरसोयी बदल दिलगिरी व्यक्त करत यापुढे असे घडणार नसल्याचे डाॅ. बर्वे यांनी सांगितले.