कोरोना काळातील महिलांच्या बिघडलेल्या मानसिक आरोग्यावर कशी मात कराल ?

मार्गदर्शक : डॉ. कल्पना श्रीधर नागरे
संपर्क क्र. 9011720400
चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ
( एम. ए. बी. एड, एम. फील. सेट, पीएचडी )

लेख वाचल्यावर ज्यांना शंका विचारायच्या आहेत अथवा ज्यांना आपल्या समस्या आणि प्रश्न आहेत अशा महिला अथवा घरातील व्यक्तींनी व्यक्तिगत संपर्क साधल्यास त्यांना परिणामकारक मार्गदर्शन करण्यात येईल. आपल्या प्रश्नांच्या उत्तरासाठी डॉ. कल्पना नागरे यांच्या 9011720400 ह्या क्रमांकावर अवश्य संपर्क साधावा.

महिलांचा सन्मान करतांना त्यांच्या समस्या जाणून घ्या

जागतिक महिला दिनाच्या दिवशी सर्व महिलांचा सन्मान केला जातो. परंतु केवळ स्त्रियांचा सन्मान न करता त्यांच्या समस्या देखील जाणून घेणे गरजेचे आहे.

सध्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकाची जीवनशैली बदललेली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे विविध शारीरिक आणि मानसिक आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. समाजातील प्रत्येक घटकाला यामुळे चांगलेच प्रभावित केलेले दिसून येत आहे. घरातील प्रत्येक व्यक्तीला मानसिक तणाव जाणवत आहे. यात प्रामुख्याने महिलावर्ग आघाडीवर आहे.

नोकरदार स्त्रिया असो किंवा गृहिणी असो सर्वांवरच मानसिक ताण वाढत आहे. सध्याच्या काळात महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची स्थिती चिंताजनक अशी आहे. आपल्याच लोकांकडून होणाऱ्या अस्वीकार्य वर्तनामुळे स्त्रियांची मानसिक कुचंबणा होत असल्याचे सध्याचे चित्र आहे. लॉकडाऊनमध्ये पुरूषांचं घरी असणं, आर्थिक संकटं, अपेक्षा पूर्ण करणं यांमुळे काही महिलांना लॉकडाऊनच्या दिवसात घरी राहणं कठीण वाटत आहे. ज्या पुरुषांना मद्यपान करण्याची सवय आहे. त्यांना दारू न मिळाल्यामुळे होणारी चिडचिड, राग, हिंसक वृत्ती याचा त्रास घरातील महिलांना होत आहे. कारण अनेक ठिकाणी स्वतःचं फ्रस्टेशन काढण्यासाठी पुरुष महिलांना शिवीगाळ करत आहेत. तर कधी मारहाण सुद्धा करत आहेत. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे

जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार भारतामध्ये प्रत्येकी पाच महिलांपैकी एक महिला तर प्रत्येकी बारा पुरुषांपैकी एक पुरुष मानसिक आजाराला बळी पडतो. यावरून भारतातील महिलांची स्थिती किती गंभीर आहे ते लक्षात येते. यामध्ये ग्रामीण आणि शहरी असा फरक करता येणार नाही. कारण दोन्ही ठिकाणी स्त्रियांच्या आजारांमध्ये फारशी तफावत दिसून येत नाही.
नोकरदार स्त्रियांमध्ये स्त्रियांपेक्षा गृहिणी असणाऱ्या स्त्रिया या मानसिक तणावाला अधिक बळी पडल्याचे संशोधनातून दिसून येत आहे. कारण तणावाच्या बाबतीत एक मोठा फरक म्हणजे ‘फक्त ऑफिसमध्ये जाऊन काम करणाऱ्यांनाच तणाव असतो व घरी असणाऱ्या गृहिणी मात्र तणावमुक्त आयुष्य जगतात.’ खरंतर आजच्या वेगवान जगात घरकाम, कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या शाळा, कॉलेज, ऑफिस यांची तयारी, त्यांची काळजी घेणे, पालकत्व या गोष्टी सुद्धा प्रचंड तणावाला जन्म देत असतात. आणि त्यांच्यावर उपाय करणे हे तितकेच गरजेचे आहे.

देशातील प्रत्येक गृहिणीवर असंख्य जबाबदाऱ्या असतात. आई, पत्नी, मुलगी, बहीण, सासू अशा अनेक भूमिका त्या निभावतात. पत्नी म्हणून नवऱ्याच्या शारीरिक व मानसिक गरजा, आई म्हणून स्वयंपाकापासून मुलांचे पालक पोषण व त्यांचा अभ्यास अशा जबाबदाऱ्या असतात. तरीही आपल्याकडे दुर्लक्ष होते अशी अनेक गृहिणींची भावना असते. गृहिणी असल्याने त्यांना आर्थिक स्वातंत्र्य नसते. जबाबदाऱ्या सांभाळूनही दुर्लक्ष झाल्यास महिलांमध्ये नैराश्य येते असे डॉक्टरांचे निरिक्षण आहे.

नोकरदार असू की गृहिणी असो तिचे वेळापत्रक ठरलेले असते परंतु आता कुटुंबातील सर्वच मंडळी घरी असल्याने घरातील व्यक्तींच्या एकावर एक मागण्या आणि अतिरिक्त कामाचा भार यामुळे देखील स्त्रियांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे.
विशेषत: नोकरदार स्त्रिया यांना आणि घरातील काम याची सांगड घालताना जास्तच होत असल्याचे दिसून येत आहे. त्याच बरोबर लॉकडाऊनमुळे कामासाठी ठेवलेल्या मावशी देखील नसल्याने अधिकच कामाची कसरत करावी लागत आहे. याशिवाय लॉकडाउनच्या काळात बऱ्याच घरांमध्ये पती-पत्नी वाद-विवाद होत असल्याचे चित्र पहायला मिळते. कारण घरातील इतर सदस्यांच्या महिलांकडून खूपच अपेक्षा असतात. नेहमी खाण्यापिण्यासाठी काहीतरी वेगळं तयार करण्याचा आग्रह केला जातो. अशात कोणाकडूनही मदतीचा हात मिळत नाही. त्यामुळे कौटुंबिक मतभेद होतात. त्यामुळे महिला स्वतःसाठी वेळ काढू शकत नाहीत. अशा स्थितीत महिलांना थकवा येणं, एकटेपणा, कामात लक्ष नसणं, चिंता आदी लक्षणे दिसतात. त्याचाही परिणाम स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे.

तुम्हालाही मानसिक ताण जाणवत असेल तर जाणून घ्या ही लक्षणे

ही लक्षणे शारीरिक आणि मानसिक अशा दोन प्रकारात पहायला मिळतात. शारीरिक लक्षणांत सारखा थकवा, सतत पोट बिघडणे, न बरी होणारी अंगदुखी, छातीची धडधड, झोप न लागणे, डोकेदुखी, लठ्ठपणा इत्यादींचा समावेश होतो. तर मानसिक लक्षणे चिडचिड, चिंता, पटकन राग येणे, गांगरणे, निराशा, आत्मविश्वासाचा अभाव, मन शांत न करू शकणे, कामे टाळत राहणे, स्वतःचा तिरस्कार करणे, कामात वा कशातच मन न रमणे, मूड बदलणे यांसारखी असू शकतात. ही लक्षणे जर सारखी सारखी आढळत असतील तर आपण नक्कीच तणावाखाली असू शकतो.

अशी करता येईल तणावावर मात !

. तणावाचे खरे मूळ हे आपल्या मनामध्ये आहे, त्यामुळे परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न करावा.

. महिलांनी आपल्या घरच्यांशी शांतपणे चर्चा करायला हवी. त्यामुळे कौटुंबिक मतभेद कमी होण्यास मदत होईल.

. घरातील काम सदस्यांमध्ये वाटून घ्यायला हवीत. जेणेकरून कामाचा ताण येणार नाही.

. स्वतःच्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष द्यायला हवं.

. व्यायाम, मेडिटेशन आणि झोप यांकडे लक्ष द्यायला हवं. जेणेकरून नेहमी ताजेतवाने वाटेल.

. आपल्या मित्र मैत्रिणींशी फोन करून बोला. तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तींकडे आपलं मन मोकळं करू शकता. त्यामुळे नैराश्य येणार नाही.

. दिवसातला ठराविक वेळ खास तुमच्या साठी राखून ठेवा. या वेळेत तुम्ही तुमच्या आवडीनिवडी छंद जोपासू शकता.

शेवटी लक्षात घ्या आपले आरोग्य संवर्धन करणे ही आपलीच जबाबदारी आहे. तुम्ही स्वस्थ तर तुमचे कुटुंब ही स्वस्थ!

( लेखिका डॉ. कल्पना श्रीधर नागरे ह्या चिकित्सा आणि बाल मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांची सेट नेट मानसशास्त्र, मनोविकृती मानसशास्त्र, उपयोजित मानसशास्त्र, वैकासिक मानसशास्त्र आदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. )