इगतपुरीनामा न्यूज, दि. ८
काही आठवड्यांपासून मेटाकुटीला आलेल्या इगतपुरी तालुक्यातील नागरिकांसाठी दिलासा देणारी चांगली बातमी आहे. कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण लक्षणीय घटले असून कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण मात्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. येणाऱ्या काळात उपचार घेत असलेले रुग्णही बरे होणार असल्याने इगतपुरी तालुका कोरोनामुक्त होण्याकडे वेगाने घोडदौड करीत आहे. निर्बंध शिथिल झाले असले तरी लोकांना नियमांचे पालन मात्र करावेच लागणार आहे. इगतपुरी तालुक्यातील बहुतांश गावे कोरोनामुक्त असून ते टिकवून ठेवण्यासाठी पंचायत समिती प्रशासनाने नियोजन केले आहे.
आज संपूर्ण दिवसभरात इगतपुरी तालुक्यात फक्त ३ नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली. आज एकाच दिवशी तब्बल १० कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आज संपूर्ण दिवस अखेर फक्त ५८ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती इगतपुरीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एम. बी. देशमुख यांनी दिली.