महाराष्ट्राची लोकप्रिय प्रेरणादायी लेखमाला भाग ३

लंडनची फेलोशिप मिळालेली पहिली दृष्टिहीन महिला डॉ. अभिधा धुमटकर

लेखन : अशोक लक्ष्मण कुमावत
संवाद : 9881856327

दोन दृष्टीहीन मुली दैवाने पदरात टाकल्या, जोडीदार अर्ध्यावर डाव मोडून अकाली निघून गेला. तरीही न डगमगता न हारता अतिशय हुशारीने, धैर्याने, जिद्दीने तिच्या आईने त्या दोन मुलींना खंबीरपणे आयुष्यात उभं केलं आणि जगण्याचं बळ दिले. दैवाने जन्मतःच तिला हे जग बघण्याचा अधिकार नाकारला होता. निसर्गाने नटलेली वसुंधरा ती कधीच बघू शकणार नव्हती. देवाच्या या अभागी देणगीवर तिने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मात करुन एक असामान्य व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविला. यशाची उत्तुंग शिखरे तिने अपार मेहनतीने पादाक्रांत केली होती.

तीला आवाज दिला की ती आवाजाच्या दिशेने कधीच पहायची नाही. मात्र डोळे तेव्हढी फिरवायची. लहानपणीच आईने डॉक्टरांना दाखवलं पण व्यर्थ तिला आयुष्यभर कधीच दिसणार नव्हते. असे ऐकताच आईचे काळीज जळून खाक झाले होते. पण करणार काय ? पोटाचा गोळा होता तो तिला आता पूर्ण आयुष्य परावलंबी जगावं लागणार या विचारांचे काहुर त्या माऊलीचे रक्त रोज आटवत होते. पण त्या महान माऊलीने इतिहास घडवण्याचा विडाच उचलला. तिच्या त्या व्यंगाचा कुठलाही  बाऊ न करता त्या माऊलीने ज्या पद्धतीने तिला घडवलयं ते खरोखरच अलौकिक आणि कौतुक करण्याजोगे आहे.

तिला अंधशाळेमध्ये न घालता त्यांनी सर्वसामान्य मुलांच्या शाळेत घातलं.! त्याचे  कारण म्हणजे तिला संपूर्ण आयुष्य ज्या समाजात वावरायचं त्या माणसांशी तीच नात घट्ट व्हायला हवं आणि तिची प्रगती व्हावी हा दूर दृष्टीकोन त्यांनी ओळखला होता. अनेक शाळांची उंबरठे आईने झिजवली पण कोणत्याच शाळेतून तिला प्रवेश मिळत नव्हता. एका शाळेने तर आईच्या जखमेवर मीठ घालावे तसे केले होते. मुलाखतीसाठी गेल्यानंतर मुलीला दिसत नाही हे माहिती असूनसुद्धा तिला रंग व खेळणी ओळखायला त्यांनी  दिली होती. आईच्या काळजाचा ठोका चुकत होता. पण ह्या मारणाऱ्या सोबतच कुणीतरी जगात तारणहार असतो ह्याचासुद्धा अनुभव त्यांना  आला.!

तिला बोरीवलीच्या सुविद्यालयात प्रवेश मिळाला. शाळेत ती दाखल तर झाली पण आता पुढे काय ? हा प्रश्न कुटुंबाला सारखी टोचणी देत होता. ती जिद्दी मुलगी अभ्यासासाठी हट्ट धरायची, अनेकविध प्रश्न निर्माण करून सगळ्यांना विचारात पाडायची. तिच्यामधील टॅलेंट ओळखून आई मात्र आपली कामे बाजूला ठेवून तिच्यावर प्रेम आणि मेहनत करत होती.
ती वक्तृत्त्व स्पर्धा, खेळ यासह सर्वत्र आपली हुशारी दाखवत होती. आत्मविश्वास हा तर तिचा श्वास बनला होता. शाळेत तिची काळजी घेणाऱ्या शिक्षकांना ती आत्मविश्वासपूर्वक खात्री देत असायची.
आता मूळ अडचण होती ती पेपर लिहिण्याची. पण तिच्या आईने अगोदरच त्याची पूर्वतयारी म्हणून लेखनिक ठेवला होता. वाढत्या वयाबरोबर आणि वर्गाबरोबर ती मोठ्या हिमतीने आव्हाने पेलत होती. ती दहावीला अंधांमधून पहिली आली. गणितात तर पैकीच्या पैकी मार्क. आईच्या पेरणीला कष्टाची साथ मिळाली आणि तिचा यशाने फोफावणारा अंकुर वर आला. सगळ्या विषयात तरबेज असणारी जिद्दी मुलगी भाषेच्या संस्कृत, मराठी, इंग्रजी  व्याकरणात अतिशय उत्तम होती. इतिहासाच्या शिक्षकांची शिकवण तिच्यावर प्रभाव पडून गेली. त्यामुळे इतिहासाकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोनच बदलून गेला आणि ती इतिहासाच्या प्रेमात पडली. पुढचा सगळा अभ्यासक्रम आणि पदव्या तिने इतिहास विषय घेऊनच पूर्ण केल्या.

सायन्सच्या उपशाखांवर 24 पुस्तके लिहिणाऱ्या मोडकांच्या प्रेरणेने तिने पीएचडी पूर्ण केली. नियमित अभ्यास शिकत असताना संस्कृत, इंग्रजी, सिंधी, बंगाली, उर्दू, इटालियन, पर्शियन, जर्मन, फ्रेंच,अरेबिक ह्या भाषांवरसुद्धा प्रभुत्व मिळवत गेली. याशिवाय कोकणी, मराठी ह्या सगळ्या भाषा तिला अस्खलित यायच्या. एम. ए., बी. एड., सेट,नेट पूर्ण झालेलं एम. फील. चालूच होतं.! नोकरीसाठी पण प्रयत्न चालू होते.! पण अंध म्हणून सर्वत्र झिडकारली जात होती. ती खूप मनातून खचायची. कालांतराने संस्कृतच्या ट्यूशन घ्यायला तिने सुरुवात केली. चाटे क्लासमध्ये पण फ्रेंच शिकवत गेली. त्यांच्या सगळ्या शाखांमध्ये दिवसभर ती मेहनतीने शिकवत होती.

डॉ. मरीयम डोसल आणि प्रो. जे. व्ही. नाईक यांच्या मार्गदर्शनामुळे तिने पीएचडी पूर्ण केली. 2010 मध्ये साठ्ये कॉलेजमध्ये नोकरीला लागली. 2014मध्ये इतिहासाच्या हेड ऑफ द डिपार्टमेंट पदाची जबाबदारी पेलली. श्रीलंका आणि ग्लासगोला कॉन्फरन्स साठी तिला आमंत्रण मिळाले. लंडनला चार्ल वॉलेर इंडिया ट्रस्टतर्फे शॉर्ट टाइम रिसर्च फेलोशिप मिळाली हे तिच्या यशाची भरारी दर्शवत होते.

तिच्या मदतीला लहान बहीण समिधा हिने खूप कष्ट उचलले. विशेष गोष्ट म्हणजे समिधाही अभिधासारखीच अभागी दृष्टीहीन आहे. पण ती सुद्धा एसएनडीटीत नोकरी करते. लंडनची फेलोशिप मिळालेली भारतातील पहिली दृष्टीहीन महिला आणि महाराष्ट्रातील पहिली अंध व्यक्ती म्हणजेच मुंबईच्या डॉ. अभिधा धुमटकर होय. ( क्रमश: )
       

( लेखक अशोक लक्ष्मण कुमावत हे राष्ट्रपती पुरस्कार विजेते शिक्षक असून लेखक, कवी, सूत्रसंचालक, वक्ता म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. )