
इगतपुरीनामा न्यूज, दि. २१ – उच्च न्यायालयाकडून बाजार समिती निवडणुकांची निकाल लागेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ३० एप्रिल २०२३ पर्यंत करण्याचे निर्देश निवडणूक प्राधिकरणाला देण्यात आले होते. या आदेशामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी बाजार समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला होता. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे पडघम आता वाजले आहे. २७ मार्चला घोटी कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी निवडणुकांचा कार्यक्रम घोषित करणार आहेत. त्यामुळे इगतपुरी तालुक्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघणार आहे.
घोटी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी गटातून ११ जागा, ग्रामपंचायत सदस्य गटातून ४ जागा, व्यापारी गटातून २ जागा, आणि हमाल मापारी गटातुन १ जागा अशा १८ जागांसाठी निवडणूक होणार आहे. आर्थिक दुर्बल गट ह्या निवडणुकीत ह्यावेळी असणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी २८ एप्रिल २०२३ ह्या दिवशी मतदान घेणार असल्याची घोषणा करणार आहेत. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडून २७ मार्चला निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे, नामनिर्देशनपत्र भरण्यासाठी २७ मार्च ते ३ एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे. छाननी ५ एप्रिलला होईल. माघार घेण्यासाठी ६ ते २० एप्रिल असा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मतमोजणी झाल्यावर ३ दिवसाच्या आत मतमोजणी करून निकालाची घोषणा होईल. ह्या निवडणूक कार्यक्रमामुळे इच्छुकांची प्रतीक्षा आणि इगतपुरी तालुक्याचे राजकारण चांगलेच तापणार आहे.