कवी : जी. पी. खैरनार, नाशिक
९४२१५११७३७ / ७०८३२३४०२१
कष्ट कऱ्याचं लेकरु,
नावं असे त्याचं बाळू !
शेळ्या रानात वळता,
मित्र सूरपारंब्या खेळू !!
दिस येता माथ्यावरी,
औत हाकतसे हळू !
नभ दाटती आकाशी,
ढग लागतसे गळू !!
राना पडे पाऊस सरी,
ओढं वाहती झुळुझुळू !
नागमोडी वळसे घेऊन,
पाणी वाजे खुळुखुळू !!
बाल मित्र डुबून डोहा,
खेळ धरा धरी खेळू !
खोल डोहात सुर घेई,
पाण्या धरी पाय बाळू !!
नाल्यातीरी साबर बोंडं,
काटे एक एक साळू !
लाल गोड चवदार गिर,
बाळू घेई गटकन गिळू !!
भादव्याच्या कडक उन्हा,
सोंगुन आने पीक शाळू !
ऊन तापता आटे ओढा,
शुभ्र चमके बारीक वाळू !!
बाजरीचे कणसं खुडून,
अंगणात कणसं वाळु !
शेनसड्याच्या खळ्यातं,
मदन बैल पातीने मळू !!
बळी मोठं स्वप्न पाही,
तू शाळा शिकरे बाळू !
ध्यास घे साहेब व्हन्या,
गाई म्हशी नको पिळु !!
शेतकरी जीवन खोटं,
शेतात नको घाम गाळू !
कष्ट सारं मीच वाहील,
राना वनांत नको पळू !!
बैल जीवन ते बळीचं,
बाळूस लागले कळू !
चार पुस्तकं शिकला,
साहेब झालासे बाळू !!
( कवी नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक आहेत. )
2 Comments