इगतपुरीनामा न्यूज, दि. २३
आईवडिलांचे छत्र कोरोनाने हिरावून घेतल्याने शेकडो शाळकरी वयातील बालकांच्या डोळ्यांतील अश्रूही सुकले आहेत. मदतीच्या बढाया मारणारे तथाकथित नातेवाईक दोन दिवसांचा फुकट सल्ला देऊन केंव्हाच सुरक्षितपणे आपल्या घरात भूमिगत झाले आहेत. आधार देण्याची जबाबदारी घेण्याचे ओझे सहन होणार नसल्याने दशक्रिया विधी नंतर संबंधित बालके जेवले की उपाशी आहेत याचीही कोणी जुजबी चौकशी करायला तयार नाही. अशा अनाथ बालकांचे पुढचे भविष्य अतिशय काटेरी आणि रक्तबंबाळ रस्त्याने जाणार आहे. ही विदारक स्थिती पाहून नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्यातील “अनाथांचा नाथ” जागृत झाला आहे. त्यांनीं कोरोनाने आईवडील गमावलेल्या चिमुरड्या बालकांसाठी हिमालयाएवढी जबाबदारी स्वतःहून स्वीकारली आहे. अनाथ झालेल्या बालकांच्या संपूर्ण शिक्षणाचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून त्यांनी स्वखर्चाने उपक्रम सुरू केला आहे. त्यांच्या उपक्रमासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके आणि कोविड मदत कक्ष ग्रुपचे हरिश्चंद्र चव्हाण आदी इगतपुरीकर आपला आधार देणार आहेत.
कोरोनामुळे आईवडील बळी गेल्याने अनेक चिमुकल्या विद्यार्थ्यांची पुढची वाट खडतर होणार आहे. अशा अनाथ विद्यार्थ्यांबाबत नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून माहिती संकलित करणे सुरू करण्यात आले आहे. ही माहिती नाशिक परिक्षेत्राचे माजी विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्याकडे उपलब्ध होताच ते अशा अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करणार आहेत. “अनाथांचा नाथ” बनून डॉ. दिघावकर हा उपक्रम स्वखर्चाने राबवत आहेत.
डॉ. प्रतापराव दिघावकर यांच्या निवासस्थानी उपक्रमाच्या नियोजनाबाबत बैठक संपन्न झाली. माजी जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके, निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, कोविड मदत कक्ष ग्रुपचे अध्यक्ष तथा माणिकखांबचे माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी बैठकीत सहभाग घेतला. ह्या उपक्रमात कोविड मदत कक्ष ग्रुप इगतपुरी तालुका सहकार्य करणार आहे. अधिक माहितीसाठी डॉ. प्रतापराव दिघावकर 9773149999, गोरख बोडके 9922750599, हरिश्चंद्र चव्हाण 8149181830 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. ( बातमी लेखन : भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा )