
इगतपुरीनामा न्यूज, दि. १७ ( वाल्मीक गवांदे, इगतपुरी )
मागील वर्षी कोविडमुळे लॉकडाऊन आणि खतांवरील वाढत्या बाजारभावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या वर्षी अवकाळी पाऊस, शेती मालाचे झालेले नुकसान, लॉकडाऊनमुळे हाती आलेला शेतमाल बेभाव विकावा लागल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. हीच परिस्थिती शेतकरी पुन्हा या वर्षीही अनुभवत आहे. आताही कोविडच्या दुसर्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन, पिकलेल्या शेतीमालाला बेभाव विकावे लागत आहेत. या नैराश्यग्रस्त परिस्थितीतून सावरत शेतकर्याने येणार्या खरीपाच्या पेरणीची पूर्वतयारी सुरू केली आहे. खरीप हंगाम येऊन ठेपल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीतील मशागतीची कामे सुरू केली आहे. पेरणीसाठी लागणारे रासायनिक खत, बी-बियाणे याची खरेदी करण्यासाठीची सुरुवात केली आहे.
मात्र शेतीसाठी लागणारे प्रमुख रासायनिक खतांचे भाव गगनाला भिडलेले दिसून येत आहे. एकीकडे शेतकर्याने पिकवलेल्या शेतीमालाला मिळणारा भाव पाहता यावर्षी सर्वसाधारणपणे खरीपाची पेरणी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होते. तत्पूर्वी, शेतकऱ्यांना आपल्या शेतातील काड्या, फणने, नांगरणी, भाजणी, वखरणी यासारखी उन्हाळ्यात करण्यात येणारी कामे करायला सुरुवात केली आहे. पेरणीसाठी वेळेवर अडचण येऊ नये म्हणून शेतकरी मे महिन्यापासून बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. त्यामुळे दुकानदारांनी देखील खते व बी-बियाणेची संबंधित कंपनीकडे नोंदणी केली आहे. शेतकरी डीएपी हे खत मोठ्या प्रमाणात पिकांना देतात.
तालुक्यात खरीप हंगामाची तयारी सुरू असताना शेतकऱ्यांनी वेळेवर धांदळ होऊ नये म्हणून मे महिन्याच्या अखेरीस बी-बियाणे, खते खरेदी करून ठेवतात. यावर्षी खताचे भाव वाढल्याने खत मिळेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केला जात आहे. एका गोणी मागे जवळपास ५०० ते ६०० रुपये अधिक मोजावे लागणार आहे. यावर्षी खताचे भाव वाढल्याने शेती करावी की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डीएपी सोबत इतर सर्वच मिश्र खतांची किंमती वाढल्या आहेत. सुपर फास्फेट पोटॅश आदी खतांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड पडणार आहे. खताच्या किंमतीसोबतच तण नाशक, कीटकनाशक यांच्या भावात देखील वाढ झाली आहे. एकूणच उत्पादन खर्च वाढणार आहे आणि शेत मालाचे भाव या तुलनेने कमी वाढत आहे. शिवाय नैसर्गिक संकटाचा फटका पिकांना बसत असतो. येणारे उत्पन्न आणि होणारा खर्च याचा ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागणार आहे.
इंधन दरवाढीमुळे मशागतीचे दर वाढले. गेल्या काही दिवसापासून पेट्रोल-डिझेलचे भाव दररोज वाढत आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी आपले दर देखील वाढवले आहेत. अंतर मशागतीचा खर्च सरासरीपेक्षा दीड पटीने वाढला आहे. बहुतेक शेतकरी आता आंतर मशागत नांगरणी, फंटण, रोटावेटर आदी कामे ट्रॅक्टरने करतात. पण आता भाव वाढल्याने शेतकऱ्यांची बजेट कोलमडणार आहे.