आज सेट परीक्षेच्या स्वरूपाविषयी माहिती देणारा लेख देत आहे. त्यामुळे दहावी बारावी नंतर पुढे काय ? ही लेखमाला उद्यापासून पुन्हा दिली जाईल याची आमच्या वाचकांनी नोंद घ्यावी.
- श्री. भास्कर सोनवणे, संपादक इगतपुरीनामा
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
■ राज्यस्तरीय पात्रता चाचणी
वरिष्ठ महाविद्यालयात ( Senior colleges ) सहाय्यक प्राध्यापक ( Assistant professor ) होण्यासाठी सेट परीक्षा विद्यापीठ अनुदान आयोगाने आवश्यक केली आहे. या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचे ( State Eligibility Test ) आयोजन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने केले जाते. आजपर्यंत सेटच्या 36 परीक्षा झाल्या असून 37 व्या परीक्षेचे आयोजन दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्र शासन व गोवा शासन यांनी प्राधिकृत केली असून नवी दिल्लीच्या विद्यापीठ अनुदान आयोगाने अधिकृत मान्यता दिलेली आहे.
■ परीक्षेसाठी पात्रता
पदव्युत्तर वर्गामध्ये ज्या विद्यार्थ्याला 55 टक्के गुण आहेत त्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. SC / ST / Transgenders / PwD या उमेद्वारांना पदव्युत्तर वर्गामध्ये 50 टक्के मार्क असल्यास त्यांनाही या परीक्षेला बसता येते.
■ फॉर्म भरण्याची मुदत
या परीक्षेचे अर्ज दि.17 मे 2021 पासून ते दि.10 जून 2021 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने भरता येतील. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याची संपूर्ण माहिती https://setexam.unipune.ac.in या संकेतस्थळावर दिलेली आहे.
■ विषय आणि परीक्षा केंद्रे
सेटची परीक्षा 32 विषयांसाठी होणार असून ही परीक्षा महाराष्ट्रासह गोवा राज्यात १५ केंद्रांवर संपन्न होणार आहे. परीक्षा केंद्रे अशी आहेत – मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि गोवा राज्यात पणजी येथे संपन्न होणार आहे.
■ परीक्षेचे स्वरुप
ही परीक्षा ऑफलाईन आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाची होणार असून या परीक्षेचे दोन पेपर आहेत. पहिला पेपर हा सर्व विषयांच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमन असून त्यामध्ये 50 वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असून हा पेपर एकूण 100 मार्कांचा असेल. हा पेपर दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 10 ते 11 या वेळेत होईल. म्हणजेच पहिल्या पेपरसाठी 60 मिनिटांचा वेळ असेल. सेटचा दुसरा पेपर हा विद्यार्थ्यांच्या पदव्युत्तर पदवीच्या विषयाशी संबंधित असून त्यामध्ये 100 वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असून हा पेपर एकूण 200 मार्कांचा असेल. हा पेपर दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी सकाळी 11. 30 ते 1. 30 या वेळेत होईल. म्हणजेच दुसऱ्या पेपरसाठी दोन तासांचा वेळ असेल.
■ महत्त्वाच्या गोष्टी
1. ऑनलाईन अर्ज https://setexam.unipune.ac.in या वेबसाईटवर फॉर्म भरता येईल. तसेच परीक्षेच्या संदर्भातील सर्व माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करून व अवलोकन करून सेट परीक्षेचा फॉर्म भरावा.
2. ऑनलाईन अर्ज दि. 17 मे 2021 ते 10 जून 2021 या कालावधीत भरता येईल याची नोंद घ्यावी.
3. ऑफलाईन पध्दतीने होणारी ही परीक्षा दि. 26 सप्टेंबर 2021 रोजी असेल.
4. या परीक्षेचे ॲडमिट कार्ड वरील संकेतस्थळावर दि. 16 सप्टेंबर 2021 पासून उपलब्ध होईल.
5. परीक्षेचे दोनही पेपर हे वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतील.
6. परीक्षेचा अभ्यासक्रम वरील संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घ्यावा.
( लेखक इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे महाराष्ट्रातील लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. विविध विषयांवर त्यांची विविध मार्गदर्शक पुस्तके प्रसिद्ध आहेत.)