
इगतपुरीनामा न्यूज – मुंबई आग्रा महामार्गावरील पुरातन व जागृत देवस्थान असलेल्या घाटनदेवी मंदिराच्या प्रवेशद्वाराची कमान विहिगावच्या दिशेने पाईप घेऊन जाणाऱ्या कंटेनरने पाडली. या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नसली तरीही कमान पूर्णपणे क्षतिग्रस्त झाली आहे. विशेष म्हणजे विहिगावला जाण्यासाठी जव्हार फाट्यापासून रस्ता असूनही वेळ व इंधनाची बचत करण्याच्या नादात अवजड वाहनांना प्रवेश बंदी असलेल्या घाटनदेवी मंदिर ते विहीगाव या एकेरी पर्यायी मार्गाचा वापर अवजड वाहनचालक सर्रास वापर करताना आढळून येत आहेत. या पर्यायी महामार्गावर घाटनदेवी मंदिर ते चिंचले फाट्यापर्यंत तीव्र उतार असून जागोजागी नागमोडी वळणे आहेत. वेळीच जर या वाहनांना बंदी केली नाही तर भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. संबंधित विभागाने त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.