– पुरुषोत्तम आवारे पाटील
संपादक : दै. अजिंक्य भारत, अकोला
संवाद – 9892162248
आपल्या पूर्वजांनी पाणी आणि निसर्ग संपत्ती असणारा मोठा ठेवा आपल्या हवाली केला आहे. असे समजुया की शंभर वर्षापूर्वी तुमच्या खापर पणजोबाने हजार कोटींची एक तिजोरी हातात दिली आहे. एवढ्या वर्षात त्यातून पैसे काढणे सुरू आहे. तिजोरीत पैसे टाकावे सुद्धा लागतात याचा आपल्याला विसर पडला आहे. भूगर्भातील पाणी आणि प्राणवायू हा साठा असाच संपण्याच्या मार्गावर आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य असेच काही वर्षापूर्वी जाणवायला लागले. ज्या गावात, गावालगतच्या आखरात हाताने पाणी उपसता यायचे अशा विहिरींनी पाहता पाहता तळ गाठला आहे. बारुदी-सुरुंग लावून विहिरीत होणार्या स्फोटांनी पाणी अक्षरशः दूर पळाले आहे. भूगर्भात काही फुटांवर उपलब्ध असणार्या पाण्याने धडा शिकवला मात्र आपण सुधरायला तयार नाही. कोरोना आपत्तीत पुन्हा एकदा नैसर्गिक स्त्रोतांशी खेळ कसा भारी पडू शकतो हे दाखवून दिले आहे. ऑक्सिजनच्या अभावाने माणसं पटापट मरायला लागतील हे कुणी मागच्या वर्षी जरी सांगितले असते तरी त्याला वेड्यात काढायला आपण मागेपुढे पाहिले नसते.
स्वार्थापोटी निसर्गाचा सत्यानाश करायला निघालेल्या मानवाने आपल्या प्रकल्पांपुरता विचार केल्याने दिसेल तेथील झाडे, जंगले, नैसर्गिक स्त्रोत नष्ट करायला सुरुवात केली. नैसर्गिक झाडांच्या कत्तली करून घरे कृत्रिम, सिमेंटच्या झाडांनी झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न आपण करीत आहोत. प्रत्येकाचे बंगल्याचे पोर्च तयार करताना त्याला सिमेंटच्या झाडांचे बुंधे तयार करण्याचे आकर्षण तयार होत आहे. त्यासाठी मार्गात येणारी खरी झाडे तोडली जात आहेत. शहरे आणि महानगरातील बगिच्यात देशी झाडांनी विटलेला हा शिक्षित नागरिक विदेशी झाडा, फुलांच्या प्रेमात पडला आहे. भरपूर ऑक्सिजन देण्यासाठी झाडे आणि वनस्पती झपाट्याने नष्ट करून शहरी नागरिक ऑक्सिजन सिलिंडरच्या शोधात आता वाट दिसेल तिकडे धावायला लागला आहे.
पृथ्वीचा सर्वाधिक भाग समुद्राने व्यापलेला असल्युळे जी झाडे सर्वाधिक ऑक्सिजन तयार करतात त्यापैकी 90 टक्के झाडे विनासायास आपल्या भोवताली फुकटात उपलब्ध आहेत याचा आपल्याला विसर पडला आहे. वड, पिंपळ, कडूनिंब, तुळशी आणि बांबू ही पाच प्रकारची झाडे सहज उपलब्ध असून, वातावरणातील 70 ते 80 टक्के ऑक्सिजन ही झाडे तयार करीत असतात. जमिनीवरील झाडांपेक्षा ती जास्त ऑक्सिजन तयार करीत असतात. झाडांची पाने ऑक्सिजन तयार करीत असतात, जे झाड सर्वात जास्त हिरवेगार आणि पानांनी लगडलेले ते आरोग्यासाठी सर्वात चांगले. पाने एका तासात पाच मिलीलिटर ऑक्सिजन तयार करतात. ज्या झाडांना जास्त पाने ती अधिक ऑक्सिजन तयार करीत असतात.
वड, पिंपळाच्या झाडांचा विस्तार आणि उंची सर्वाधिक असल्याने ही झाडे दिवसातून 22 तासांपेक्षा जास्त ऑक्सिजन देणारे ठरले आहेत. पिंपळ रात्रीही ऑक्सिजन देत असतो. या झाडांना मात्र आम्ही अंधश्रद्धेच्या झालरी लावून बाजूला टाकले आहे. या झाडांवर भुते राहात असल्याच्या खुळचट कल्पना ज्यांनी तयार केल्या त्यापेक्षा जे तसे मानतात ते घटक खरंच धन्य समजले पाहिजेत. घरापुढील वा अंगणात वड, पिंपळ नको म्हणत तोडणारे आणि कुण्याही ऐर्यागैर्याचा सल्ला मानणारे लोक खरोखर महान समजले पाहिजेत. आधीच सिमेंटच्या जंगलांनी आपले श्वास कोंडले आहेत, अशावेळी प्रत्येक घरात गॅस सिलिंडर सारखा ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्याची वेळ टाळायची असेल तर आताही वेळ गेलेली नाही. एका महिन्यानंतर सुरू होणार्या पावसाळ्यात वड, पिंपळ, कडूनिंब, तुळशी लागवडीचे नियोजन करा, तुमच्या सभोवताली मोकळा परिसर दिसला की त्यावर सर्वाधिक ऑक्सिजन देणारी झाडे लावा. लक्षात ठेवा निसर्ग एक पट घेतो आणि हजार पट परत करतो. त्याला अजूनही मानवी स्वभावाची लागण झाली नाही. दवाखान्यातल्या ऑक्सिजन सिलिंडरमुळे जे वाचले त्यांनी तर प्रत्येकाने संकल्प करावा की, आगामी काळात किमान शंभर झाडे लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. शहरातल्या असंख्य जागा उजाड आहेत. त्यावर काही यंत्रणांना सोबत घेऊन असे प्रयोग करता येतील. एक झाड लावाल ते विविध प्रकारची 10 कामे आपोआप करते याचा प्रत्यय घ्यायचा असेल तर विचार करीत बसण्यापेक्षा कृती करायला हवी.