सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये ‘व्याकरण’ या अभ्यास घटकावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. योग्य मार्गदर्शन नसल्याने अनेकांना यामुळे हा विषय जड जातो. पैकीच्या पैकी मार्क मिळवून भरघोस यश मिळवायचे असेल तर या घटकाची तयारी कशी करावी ? याबाबत परिपूर्ण मार्गदर्शन करणारा हा लेख..!
मार्गदर्शक – प्रा. देविदास गिरी
उपप्राचार्य, इगतपुरी महाविद्यालय
संपर्क : 9822478463
■ व्याकरणातील घटक
व्याकरण या विभागात शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, वर्णविचार, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, संधी, उभयान्वयी अव्यय, केवलप्रयोगी अव्यय, काळ, वचन, विभक्ती, समास, प्रयोग, लिंगविचार, शब्दसिध्दी, वाक्यविचार, विरामचिन्हे यावर प्रश्न विचारले जातात.
■ अभ्यासाची सोपी पद्धत
स्पर्धा परीक्षांमधील व्याकरण हा घटक जर सोपा करावयाचा असेल तर अभ्यासाची एक सोपी पद्धत आहे. ती म्हणजे यापूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमध्ये कसा प्रश्न विचारला गेला आहे ? याचे बारकाईने अवलोकन केले तर विद्यार्थी व्याकरणावरील सर्व प्रश्न अचूकपणे सोडवू शकतो. प्रत्येक भागावरील प्रश्न बाजूला काढून त्याचा सराव करताना प्रत्येक घटकाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. उदाहरणार्थ – अहाहा, छान, बाप रे, छे छे या शब्दांना व्याकरणात काय म्हणतात ?
A. विशेषणे
B. क्रियाविशेषणे
C. केवलप्रयोगी अव्यये
D. उभयान्वयी अव्यये
या प्रश्नाचा योग्य पर्याय C केवलप्रयोगी अव्यये हा आहे. येथे विद्यार्थी फक्त प्रश्नाचे योग्य उत्तर शोधतो. तसे न करता उत्तर शोधल्यावर ‘केवलप्रयोगी अव्यय’ म्हणजे काय ? त्याची व्याख्या व केवलप्रयोगी शब्दांची यादी तयार केल्यास यावरील कोणताही प्रश्न सोडविता येईल.
■ प्रश्नांची सूची तयार करा
स्पर्धा परीक्षांमध्ये व्याकरणाची तयारी करताना यापूर्वी झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचे अवलोकन व्हावे. त्यात विचारलेल्या प्रश्नांची सूची तयार करावी. उदाहरणार्थ – पुढीलपैकी कोणते लेखन बरोबर आहे ?
A. वीजिगिषा
B. विजिगीशा
C. विजिगीषा
D. विजिगिषा
या प्रश्नाचा योग्य पर्याय C विजिगीषा हा आहे. विजिगीषा म्हणजे जिंकण्याची इच्छा होय. अशा प्रकारे त्या शब्दाचा अर्थ शोधा. कारण एका प्रश्नपत्रिकेत वरीलप्रमाणे प्रश्न विचारला होता. पुढच्या एका प्रश्नपत्रिकेत विजिगीषा या शब्दाचा अर्थ कोणता ? असा प्रश्न विचारला होता. शुध्द शब्द ओळखा यावर बरेच प्रश्न विचारले जातात. मराठीत लेखन करताना कोणत्या शब्दात चुका होतात अशा शब्दांची यादी तयार करा. त्याचप्रमाणे त्याचे अर्थही माहिती करून घ्या.
■ प्रयोगविचार
वाक्यातील प्रयोग ओळखा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांना प्रयोगावरील प्रश्न अवघड जातात कारण अशा प्रश्नांची मनात असलेली भीती होय. वास्तविक व्याकरणातील हा सर्वात सोपा भाग आहे. उदा. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवावे या वाक्यातील प्रयोग ओळखा ?
A. कर्तरिप्रयोग
B. कर्मणिप्रयोग
C. भावे प्रयोग
D. संकर प्रयोग
या प्रश्नाचा योग्य पर्याय C भावे प्रयोग हा होय. येथे विद्यार्थ्यांनी भावे प्रयोग म्हणजे काय ? ते समजून घ्यावे. त्याचे विशेष काय असतात ? त्याची माहिती करून घ्यावी.
■ समास
व्याकरणातील प्रश्नांमध्ये हमखास या घटकावर प्रश्नपत्रिकेत प्रश्न विचारले जातात. हा भाग सुध्दा खूप सोपा आहे. उदाहरणार्थ – पुरणपोळी, बालमित्र, नातसून हे शब्द कोणत्या समासाची उदाहरणे आहेत ?
A. द्वंद्व
B. मध्यमपदलोपी
C. द्विगू
D. अव्ययीभाव
या प्रश्नाचा योग्य पर्याय B मध्यमपदलोपी हा होय. येथेही मध्यम पदलोपी समास म्हणजे काय ? मध्यमपदलोपी समास कसा ओळखायचा ? हे चांगल्या प्रकारे माहित करून घेतले तर समास ओळखणे हा भाग खूप सोपा होय. हे तुमच्याही लक्षात येईल.
■ समजून घेऊन प्रश्न सोडवा
व्याकरण हा भाग तसा खूप सोपा आहे. म्हणून याची भीती सर्वप्रथम मनातून काढून टाका. या घटकावरील पैकीच्या पैकी गुण मिळविता येतात. फक्त प्रश्न समजून घेऊन तो सोडविणे आवश्यक आहे ही गोष्ट लक्षात ठेवा.
( लेखक इगतपुरी येथील केपीजी कॉलेजचे उपप्राचार्य असून स्पर्धा परीक्षांचे लोकप्रिय मार्गदर्शक आहेत. )
3 Comments